Wed, Jun 26, 2019 23:31होमपेज › Marathwada › ‘पुतळ्याची तोडफोड करणार्‍या पोलिस निरीक्षकास तत्काळ निलंबित करा’

‘पुतळ्याची तोडफोड करणार्‍या पोलिस निरीक्षकास तत्काळ निलंबित करा’

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 12:58AMवसमत : प्रतिनिधी

बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे शिवाशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करणारे पोलिस निरीक्षक यांची चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले असून या घटनेचा निषेध मातंग सेवक संघाच्या वतीने करण्यात आला आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील इसरूळ येथे दि. 21 मार्च रोजी पोलिस निरीक्षक काळेगावकर यांनी साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची तोडफोड करून कोणतीही सूचना न देता दलित समाजाच्या भावनांचा उद्रेक करण्याच्या उद्देशाने पोलिस ठाण्यात पुतळा ठेवला होता. याबाबत सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांना चौकशी केली असता, त्यांच्यावर लाठीहल्‍ला करून कार्यकर्त्यांना अटक करत खोटे गुन्हे दाखल केले असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. 

शिवाय या पोलिस अधिकार्‍याची चौकशी करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा व त्यांना निलंबित करावे, कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे तत्काळ मागे घ्यावे, अशी मागणीदेखील करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास  दलित समाज मातंग सेवक संघ यांच्या  वतीने राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन छेडले असा इशारा उपविभागीय अधिकारी वसमत यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. निवेदनावर नितीन साळवे, मिलिंद मस्के, बबन वाघमारे, प्रभाकर तलवारे, राजू गायकवाड, विजयकुमार एंगडे, विक्रम वाघमारे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.


 

Tags : parbhani, parbhani news, Suspend Police Inspector ,  broke Statue