Mon, Apr 22, 2019 21:38होमपेज › Marathwada › वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाने आरोग्य धोक्यात

वीटभट्ट्यांच्या प्रदूषणाने आरोग्य धोक्यात

Published On: Mar 06 2018 1:39AM | Last Updated: Mar 06 2018 1:33AMअंबासाखर : प्रतिनिधी 

वीटभट्ट्यांने शहरासह प्रत्येक खेड्याला वेढा घातला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून अनेकांना दम्याचा त्रास सुरू झाला आहे. लहान मुलांचे पोट सुजणे आदी आरोग्य समस्या निर्माण झाल्या. वीटभट्ट्यांसाठी  ट्रक मधून राखेची वाहतूक करताना रस्त्यावर पडलेली राख व हवेने उडालेले कण दुचाकीस्वाराच्या डोळ्यात गेल्याने इजा होत आहेत.  

दहा वर्षांपूर्वी अंबाजोगाई शहरालगत जमिनी विकत घेऊन वीटभट्टी सुरू करणारे बोटावर मोजण्याएवढे चालक होते. वहितीसाठी लायक नसलेली जमीन विकत घेऊन त्या जमिनीतील मातीच्या वीटा बनवण्यात येत होत्या, मात्र परळी येथील थर्मल पॉवर स्टेशनमधील निघणार्‍या राखेचे प्रदूषण परळी शहराची डोकेदुखी बनली होती. तत्कालीन जिल्हाधिकार्‍यांनी परळीची डोकेदुखी कमी करण्यासाठी प्रदूषणमुक्त असणार्‍या अंबाजोगाईच्या वीटभट्टी चालकांना मोफत राख उचलण्याची विनंती केली. वीटभट्टी चालकांनी त्यावेळी आपल्यावरील रॉयल्टी माफ करुन घेतली. त्यावेळी पासून रॉयल्टी वसुलीच्या फंडा बंद झाला. शासनाचे महसुल बुडाला मात्र याकडे कुणीही लक्ष दिले नाही. 

अंबाजोगाई शहर व प्रत्येक खेडेगावची अवस्था अशी झाली की वीटभट्ट्यांच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे, मात्र या समस्येकडे कुणालाच पाहायला वेळ नाही. पूर्वी वीटभट्टीवर वापरण्यात येणार्‍या मातीची रॉयल्टी महसूल खाते घेत होते. आज प्रत्येकजण उठसूट वीटभट्टी काढून प्रदूषणात वाढ करत आहे. महसूल प्रशासन याकडे डोळेझाक करत आहे तर तलाठी यासर्व बाबीवर नियंत्रण करण्याऐवजी हतबलता दाखवत असल्याने समस्या वाढली आहे.

पिकांवर विपरीत परिणाम

परळीच्या नागरिकांनी थर्मलच्या राखेमुळे होणार्‍या प्रदूषणाविरुद्ध आंदोलन उभे केले. त्यामुळे प्रशासनाला दखल घेऊन पर्यायी व्यवस्था करावी लागली. वीटभट्यामुळे अनेक शेतकर्‍यांच्या शेतीतील पिकावर विपरीत परिणाम होत आहे. अंबाजोगाई शहराभोवती व ग्रामीण भागातील प्रत्येक खेडेगावला वेढा घातलेल्या वीटभट्ट्या बंद कराव्यात म्हणून रिपब्लिकन सेनेच्यावतीने तहसीलदार यांना निवेदन दिल्यानंतर तहसीलदारांनी    पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी चार पथके तयार करण्यात आली. अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले असले तरी कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने समस्या कायम आहे.

केवळ शंभर वीटभट्ट्यांची नोंद

महसूल खात्याकडे फक्त शंभर विटभट्ट्यां सुरू असल्याची नोंद आहे.  प्रत्यक्षात हा आकडा हजाराच्या जवळ पोहचू शकतो. अंबाजोगाईच्या तालुक्यात तयार होणार्‍या वीटा आंध्रा, कर्नाटक, गुलबर्गा अशा इतर राज्यात जातात. प्रत्येक वीटभट्टी चालक सिझनमध्ये किमान वीस  ते पन्नास लाखापर्यंत वीटा तयार करुन विकतात. त्यासाठी लागणारी राख ट्रक, ट्रॅक्टर, टिप्परमधून परळीच्या थर्मल मधून आणली जाते. ती ओली असल्याने रस्त्याने सांडते. उन्हामुळे दिवसा वाळताच त्यावरून वाहन गेले की वार्‍याने दुचाकीस्वाराच्या डोळ्यात जात असल्याने  अनेकांच्या डोळ्यांना इजा झाल्या.