Thu, Apr 25, 2019 23:48होमपेज › Marathwada › जन्माला आला मुलगा, रुग्णालयाने दिली मुलगी

जन्माला आला मुलगा, रुग्णालयाने दिली मुलगी

Published On: May 22 2018 1:28AM | Last Updated: May 21 2018 10:39PMबीड : प्रतिनिधी

येथील जिल्हा रुग्णालयात एका महिलेची प्र्रसूती होऊन मुलगा झाला. रुग्णालयाने तसे प्रमाणपत्र देत नवजात मुलास श्‍वसनाचा त्रास होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. यावरून सदरील मुलास बीड येथील एका खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तेथे उपचार घेतल्यानंतर त्या रुग्णालयातून मुला ऐवजी मुलगी प्रसूत महिलेच्या हाती देण्यात आली. सदरील रुग्णालयाने अदलाबदल केल्याचा आरोप प्रसूत महिलेसह नातेवाइकांनी केला. यामुळे तणाव निर्माण झाला होता. 

हिंगोली जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या मात्र ब्रम्हनाथ तांडा (उपळी, ता. धारूर) येथे मजुरीसाठी आलेल्या राजू खिटे यांची पत्नी छाया (वय 23) यांना प्रसूतीसाठी 11 मे रोजी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी 4 वाजता सदरील महिला प्रसूत झाली. यावेळी महिलेस 1 किलो 500 ग्राम वजनाच्या मुलाने जन्म दिल्याचे प्रमाणपत्र जिल्हा रुग्णालयाकडून देण्यात आले, एवढेच नव्हे तर मुलाचे वजन कमी असून त्यास श्‍वसनाचा त्रास असल्याने खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्लाही देण्यात आला. 

छाया यांना अगोदर चार वर्षांची मुलगी असून आता मुलगा झाल्याने नातेवाइकांनी पेढे वाटून आनंदही साजरा केला. यानंतर नवजात मुलास शहरातील एका खासगी बाल रुग्णालयात दाखल केले. तेथे योग्य उपचार होत नसल्याने बसस्थानकासमोरील दुसर्‍या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. या रुग्णालयात सात ते आठ दिवस उपचार घेतल्यानंतर  नवजात बालकाची प्रकृती समाधानकारक झाली. 

यानंतर मुलास रुग्णालयातून सुटी देण्यात आली. यावेळी मात्र महिलेच्या हाती मुला ऐवजी मुलगी देण्यात आली. त्यामुळे नातेवाइकांमध्ये गोंधळ निर्माण झाला.  यावेळी मुलाची आदलाबदल झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला. नेमकी आदलाबदल कोठे झाली, या संदर्भात मात्र नातेवाइकांमध्ये संभ्रमावस्था आहे. एनआयसीयू उपचारपद्धतीत पालकांना प्रवेशाची बंदी असल्याने निरक्षर असलेल्या पालकांना सदरील नवजातास पाहताही आले नव्हते. नवजात जन्मल्यानंतर नवजाताच्या पित्याने, आईने व इतर नातेवाइकांनी मुलगाच असल्याचा दावाही केला आहे. सोबतच शासकीय रुग्णालयातील प्रमाणपत्रही मुलगाच असल्याचे दाखवत आहे. दरम्यान,सध्या मुलीला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.