Mon, Aug 19, 2019 04:55होमपेज › Marathwada › ब्लॉग : आणि बाबासाहेब सावरले..

ब्लॉग : आणि बाबासाहेब सावरले..

Published On: Dec 17 2017 8:03AM | Last Updated: Dec 17 2017 8:03AM

बुकमार्क करा

का कुणास ठाऊक? पण सार्वजनिक जीवनामध्ये पहाडाची उंची गाठलेल्या अनेक व्यक्‍ती पत्नीच्या विरहानंतर मोडून पडतात. मी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवनचरित्र वाचत होतो. बाबासाहेबांची पत्नी रमाई निधन पावल्यानंतर बाबासाहेब अगदी एकाकी पडले होते, असे दिसून आले.

रमाई वारल्यानंतर दिवस जात राहिले, बाबासाहेब एकाकी झाले. कित्येक दिवसांदिवस खंगत चालले होते. त्यांच्याही प्रकृतीमध्ये गुंता निर्माण झाला. खूप औषध उपचार करूनही फारसा फरक पडत नव्हता. रमाईंची आठवण आल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी डबडबलेले असत. त्यांना चालू असलेल्या औषध उपचाराने फारसा फरक पडत नव्हता. शेवटी एका वैद्याने त्यांना सल्ला दिला आणि लोणावळ्यामधील ‘कैवल्यधाम योग आश्रमात’ दाखल केले. तेथील उपचार घेऊन बाबासाहेबांच्या प्रकृतीमध्ये फरक पडला.26 मे 1935 ला बाबासाहेबांच्या लाडक्या रमाईंनी इहलोकाचा निरोप घेतला. 

रमाईंच्या निधनानंतर बाबासाहेब एकाएकी पडले, त्यांची मनःस्थिती गोंधळली, भूक मंदावली, डोकेदुखीचा त्रास सुरू झाला. कदाचित अर्धशिशीचे दुखणे असावे. बाबासाहेबांना वेदना सहन होईना. अशा परिस्थितीत झोपेनेही सहकार्य करायचे नाकारले. या परिणामामुळे हळूहळू बाबासाहेबांचे शरीर अत्यंत कृश झाले, लोक येत होते, भेटत होते, हळहळत होते. मुलांकडे पाहून उभारी घ्यावी, असा सल्ला ते देत होते. हे सगळे ठीक होते; पण शेवटी ज्याचे दुखणे त्यालाच सहन करावे लागते. बाबासाहेबांच्या सर्व तपासण्या नामांकित डॉक्टरांनी केल्या. त्यांना व्याधी तर कोणतीच नव्हती. डॉक्टरांनी त्यांना हवापालट करण्याचा सल्ला दिला. बाबासाहेबांचे विश्‍वासू देवराव विष्णू नाईक यांनी त्यांना कैवल्यधाम योग आश्रमात भरती केले.स्वामी कैवल्यानंद यांनी लोकसेवेसाठी स्वतः ला झोकून दिले होते. त्यांनीच हे आयुर्वेदिक इस्पितळ सुरू केले. बाबासाहेब उपचार केंद्रात दाखल झाले. योगविद्या अभ्यास, निसर्ग उपचार यांमुळे बाबासाहेबांना व्याधींवर नियंत्रण मिळविता आले. आपल्या मनातल्या दुःखांवर मात करण्यासाठी या आश्रमात ध्यानसाधना त्यांच्याकडून करून घेतली. 

5 एप्रिल 1936 या दिवशी बाबासाहेबांनी कैवल्यधाम आश्रमात प्रवेश घेतला. आश्रमाचा दिनक्रम अत्यंत उत्साहवर्धक होता. दिवस सकाळीच 6 वाजता सुरू व्हायचा. उठल्याबरोबर वनस्पतीयुक्‍त अर्काचा चहा देत, अर्धा तास यागिक शुद्ध क्रिया चाले, सकाळी योगाभ्यास केल्यावर विश्रांती, 9 ते 12 निसर्गउपचार. मग दुपारी भोजन, 1 ते 5 पुन्हा विविध उपचार, 5 ते 7 प्राणायाम आणि योगाभ्यासाची दिनाचर्या बाबासाहेबांची सुरू झाली. प्रकृती सुधारू लागली; पण डोकेदुखी मात्र पिच्छा सोडत नव्हती. डोकेदुखीला उपाय म्हणून एका वनस्पतीच्या पाल्याचा लेप डोक्यावर लावायचा स्वामींनी निर्णय घेतला. हा लेप परिणामकारक ठरला.

आश्रमाच्या मागे सूर्योदयाच्या आधी बाबासाहेब फिरायला जात असत. टेकडीवरील बुद्धकालीन प्राचीन गुंफा होती. तेथे जाऊन बसायचे. तेथील सर्व ग्रंथ बाबासाहेबांनी वाचून काढून या सगळ्यांचा चांगला परिणाम प्रकृतीवर झाला. हळूहळू डोकेदुखीचा त्रासही कमी होत गेला. रमाईंच्या आठवणींचा दाहकपणा पुसट होत गेला. शेवटी बहुजन समाजाचे, दलित समाजाचे बाबासाहेब धडधाकट प्रकृतीतून आवश्य बरे झाले. पुढे बाबासाहेबांनी उर्वरित आयुष्यात मुक्या समाजाला बोलकं करण्यासाठी खर्ची घातले. बाबासाहेबांनी वैयक्‍तिक शोक आवरत आजारावर मात केली. बाबासाहेब पुन्हा लढ्यात उतरले. बाबासाहेब तुमच्यामुळे आम्ही ‘मुकी’ माणसे ‘बोलकी’ झालो. निरक्षरतेवर आम्ही मात केली. आमच्यातील सुप्तगुणांना तुम्ही सूर्यप्रकाश दाखवला. म्हणून तुम्हीच आमचे सूर्य आहात.

प्रा. दिनकर बोरीकर