Mon, May 27, 2019 09:35होमपेज › Marathwada › बीडमध्ये साकारतेय भीमसृष्टी; काम प्रगतिपथावर

बीडमध्ये साकारतेय भीमसृष्टी; काम प्रगतिपथावर

Published On: Apr 14 2018 1:42AM | Last Updated: Apr 14 2018 1:42AMबीड : प्रतिनिधी

शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भीमसृष्टी उभारण्यात येत आहे. भीमसृष्टीचे काम प्रगतिपथावर आहे. चाळीस लाख रुपये खर्चून उभारण्यात येणार्‍या या भीमसृष्टीत सहा ऐतिहासिक चित्र असणार आहेत.

बीडचे नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या पुढाकारातून शहरातील शिवाजी पुतळ्याजवळ आकर्षक आणि नावीन्यपूर्ण अशी शिवसृष्टी उभारण्यात आलेली आहे. या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची महती दर्शवणारी शिल्पचित्रे काढण्यात आलेली आहेत. सोलापूर-धुळे महामार्गावर शहराच्या मध्यवर्ती भागातील ही शिवसृष्टी सर्वांचेच लक्ष वेधणारी ठरत आहे.

बीड नगरपालिकेने शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर भीमसृष्टी उभारण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. यामध्ये सहा शिल्प असणार असून यामध्ये चवदार तळे सत्याग्रह, दीक्षा समारंभ, चैत्यभूमी, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे इंग्लंडमधील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर पदवी घेतानाचे शिल्प, सयाजीराव गायकवाड, शाहू महाराज, गाडगेबाबा, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासोबतची डॉ.आंबेडकरांची शिल्पे या ठिकाणी साकारण्यात येणार आहेत. 

पुणे करार, घटना समिती, घटना देतानाचे शिल्पही या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. या भीमसृष्टीत गौतम बुद्धांचा सहा फु टांच्या दोन मूर्ती उभारण्यात येणार आहेत.

शहरातील पुतळ्याचेही सुशोभीकरण होणार

शिवसृष्टीनंतर नगरपालिकेने भीमसृष्टीचे काम हाती घेतले आहे. आता या कामाबरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व परिसराचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये पुतळ्याच्या कठड्याची उंची वाढवण्याबरोबरच आकर्षकपणे सजावट करण्यात येणार आहे. परिसराचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होत होती. त्याला आता मूर्तरूप येणार असून शिवसृष्टी, भीमसृष्टी आणि पुतळा सुशोभीकरणाने बीडच्या सौंदर्यात नक्‍कीच भर पडणार आहे.

 

Tags : beed, beed news, bhimsrushti,