Sun, May 26, 2019 09:50होमपेज › Marathwada › ‘काँग्रेसच्या बंद’ दरम्यान राष्ट्रवादीचा सवतासुभा

‘काँग्रेसच्या बंद’ दरम्यान राष्ट्रवादीचा सवतासुभा

Published On: Sep 11 2018 1:37AM | Last Updated: Sep 10 2018 7:54PMउस्मानाबाद : प्रतिनिधी

काँग्रेसने पुकारलेल्या देशव्यापी बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्ह्यातही पाठिंबा दिला खरा; मात्र राष्ट्रपतींच्या नावे स्वतंत्र निवेदन देत सवतासुभाही जपला. काँग्रेसचे नेते मोजक्या कार्यकर्त्यांसमवेत बंदचे आवाहन करताना दिसले. शहरासह जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

इंधनाच्या वाढत्या दरांवरुन काँग्रेसने देशव्यापी बंद पुकारल्याने सोमवारी जिल्ह्यात सकाळपर्यंत संभ्रमावस्था होती. जिल्ह्यातील काँग्रेस नेते आ. बसवराज पाटील, आ. मधुकरराव चव्हाण, प्रशांत चेडे यांच्यासह इतर प्रमुख 2 - 3 नेत्यांच्या गावांत कडकडीत बंद पाळण्यात आला. यात मुरुम, परंडा, अणदूर, वाशी यांसारख्या गावांचा समावेश होता. उर्वरीत जिल्ह्यात मात्र संमिश्र प्रतिसाद मिळाला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आप्पासाहेब पाटील, माजी जिल्हाध्यक्ष विश्‍वास शिंदे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर आदी नेत्यांनी बंदचे आवाहन केले. उस्मानाबाद शहरात काही भागात संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकार्‍यांना सोबत घेत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन दिले. वाढलेल्या इंधन दरांवर राष्ट्रपतींनीच नियंत्रण आणावे, अशी मागणी त्यात केली. बंदचे आवाहन करीत राष्ट्रवादीचा कार्यकर्ता रस्त्यावर दिसलाच नाही. मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे, राजेंद्र गपाट आदींनी आपापल्या गावात बंद पाळण्यात पुढाकार घेतला. दुपारी तीननंतर जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत झाले.

स्कूलबसमुळे शाळा बंद

इंधन दरवाढीला तोंड देत असलेल्या स्कूल बस चालकांनी बंदमध्ये 100 टक्के सहभाग घेतल्याने नाईलाजाने शहरातील सर्वच शाळांना अघोषित सुटी मिळाली.