Thu, Nov 15, 2018 01:13



होमपेज › Marathwada › साडेतीन वर्षे झाली तरी विकासाचा पाळणा हालत नाही : अजित पवार

साडेतीन वर्षे झाली तरी विकासाचा पाळणा हालत नाही : अजित पवार

Published On: Jan 18 2018 7:49PM | Last Updated: Jan 18 2018 7:43PM



बीड : प्रतिनिधी

शेतकरी आज उध्वस्त होण्याच्या मार्गावर असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत समाजातील वेगवेगळया घटकाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सरकारविरोधातील हा एल्गार असाच सुरु ठेवणार असल्याचा इशारा विधीमंडळाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेवराई येथील विराट सभेमध्ये दिला.

भाजप-सेनेच्या संसाराला साडेतीन वर्ष झाली तरी त्यांच्या विकासाचा पाळणा हालत नाही अशी परिस्थिती आहे. आणखीन किती दिवस पहिल्या सरकारला दोष देत बसणार आहात. या सर्व गोष्टीचे सरकारने आत्मपरिक्षण आणि आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा सल्ला ही अजित पवार यांनी यावेळी दिला.

बीड जिल्हयातील गेवराई तालुक्यामध्ये जगदंब आयटीआय कॉलेजच्या मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आज सभा पार पडली. आमदार अमरसिंह पंडीत आणि युवा नेते विजयराजे पंडीत यांच्या नेतृत्वाखाली ही सभा घेण्यात आली. सभेपूर्वी गढी गावापासून विजयराजे पंडीत यांच्या नेतृत्वाखाली भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रेचा हा तिसरा दिवस असून या हल्लाबोल यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही परंतु जर कुणी आरे ला कारे म्हणत असेल तर त्याला जशाच तसे उत्तर द्या अशा स्पष्ट सुचनाच यावेळी दिल्या. तर २०१४ च्या निवडणूकीमध्ये राष्ट्रवादी पक्षाला जो दणका दिला तसा न देता, येण्याऱ्या निवडणूकांमध्ये खासदार आणि सहाच्या सहा आमदार राष्ट्रवादीचेच असले पाहिजे असे आवाहन गेवराई आणि मराठवाडयातील जनतेला केले. 

आज देशाची वाटचाल अराजकतेकडे जात आहे. देशात आणीबाणी लागण्याची अवस्था निर्माण झाली आहे की काय अशी भीती जनतेमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे ज्या - ज्यावेळी विकासाचा मुद्दा येईल, त्यावेळी राजकीय जोडे बाहेर काढले  पाहिजेत. कारण त्यामध्ये सर्वसामान्याच्या विकासाच्या भावना जोडलेल्या असतात असेही अजित पवार म्हणाले. या सरकारला मराठवाडयाबद्दल आस्थाच राहिलेली नाही असाही आरोप अजित पवार यांनी केला. बीड जिल्हयाने परळी वगळता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगली साथ दिली आहे. आज महाराष्ट्रातील हवा बदलत आहे. लोक सरकारमधून बाहेर पडत आहेत. सुरुवातीस मोदी सरकार तरुणांसाठी काही तरी करेल अशी अपेक्षा होती. मात्र आत्ता तरुणांना कळून चुकले असून हाच तरुण पेटून उठून रस्त्यावर उतरला आहे असेही अजित पवार म्हणाले.

विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे म्हणाले, कापसाच्या प्रश्नावर विधानभवनात आवाज उठवून बोंडअळीने हैराण झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई देण्याची मागणी केल्यानंतर जाग आलेल्या सरकारने तुटपंजी भरपाई जाहीर केली. मात्र तीही दिलेली नाही त्यामुळे आता यांच्यातील अशा अळीला ठेचून काढण्याची वेळ आली असल्याचे जोरदार टिका केली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून हल्लाबोलची ही ठिणगी पडली असून ती ठिणगी तशीच पुढे नेण्यासाठी आपण प्रयत्न करुया.

या सभेवेळी इतर पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आज हल्लाबोलच्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशीच्या पहिल्या सभेलाही जनतेने उत्स्र्फुर्तपणे प्रतिसाद दिला.

या सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, आमदार अमरसिंह पंडीत,महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ,आमदार विक्रम काळे,आमदार सतिष चव्हाण, आमदार रामराव वडकुते, आमदार विदया चव्हाण,आमदार जयदेव गायकवाड, आमदार राजेश टोपे, माजी मंत्री प्रकाश सोळंके, माजी आमदार संजय वाकचौरे,युवक नेते विजयराजे पंडीत,युवा नेते संदीप क्षीरसागर, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील,बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनावणे,युवक जिल्हाध्यक्ष जयसिंग सोळंके,महिला जिल्हाध्यक्षा रेखा फड,गेवराई तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर,ओबीसी सेलचे अध्यक्ष ईश्वर बाळबुधे,अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष गफार मलिक,सुरेखा ठाकरे,डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे, आदींसह अनेक नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.