Sun, Jul 05, 2020 03:21होमपेज › Marathwada › बीड : शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या पुतणीचा खून

बीड : शेतीच्या वाटणीवरून सख्ख्या पुतणीचा खून

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

परळी वैजनाथ : प्रतिनिधी

शेतीच्या वाटणीवरून असलेल्या वादातून चुलत्याने पत्नी आणि सासरच्या व्यक्तींच्या मदतीने पुतणीचा विष पाजून खून केल्याची घटना परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथे घडली. याप्रकरणी पाच जणांवर  गुन्हा नोंदविण्यात आला.

बबिता व्यंकटी भताने (वय १९) असे या प्रकरणातील मयत युवतीचे नाव आहे. या घटनेबाबत बबिताची आई ठकूबाई व्यंकटी भताने यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सविस्तर माहिती अशी कि, परळी तालुक्यातील अस्वलआंबा येथील व्यंकटी हरिभाऊ भताने आणि सख्खा भाऊ विठ्ठल हरिभाऊ भताने यांची शेजारी-शेजारी प्रत्येकी साडेआठ एकर शेतजमीन आहे. २४ नोव्हेंबर रोजी रात्री ७.३० वाजता विठ्ठल भताने जेसीबी मशिनच्या साह्याने बांध फोडून व्यंकटी यांच्या ताब्यातील जमिनीपैकी अर्धा एकरवर कब्जा करू लागला. यावरून दोघा भावांत वाद सुरु झाला. यातून मारहाण सुरू झाली. 

यावेळी मुलगी बबिता आईला वाचविण्यासाठी मध्ये पडली असता पाचही आरोपींनी संगनमताने तिला खाली पाडून बळजबरीने विषारी औषध पाजले. अत्यावस्थ बबिताला तातडीने अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात दाखल केले. परंतु, काल सोमवारी रात्री ११.४५ वाजताच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, असे ठकूबाई व्यंकटी भताने यांनी फिर्यादीत नमूद केले आहे.

अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आज मंगळवारी दुपारी कलम ३०२, ४५२, १४३, १४७, १४९, ३२३, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक श्रीकांत हरगबाळ हे पुढील तपास करीत असून सध्या सर्व आरोपी फरार आहेत.