Sat, Nov 17, 2018 20:34होमपेज › Marathwada › दहावीच्या विद्यार्थिनीचा खून करुन तरुणाची आत्महत्या

दहावीच्या विद्यार्थिनीचा खून करुन तरुणाची आत्महत्या

Published On: Mar 10 2018 9:46AM | Last Updated: Mar 10 2018 10:09AMकेजः दीपक नाईकवाडे 

केज तालुक्यातील ढाकेफळ येथे दहावीची परीक्षा देत असलेल्या अल्पवयीन मुलीचा एकतर्फी प्रेम प्रकरणातून गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली. तिची हत्या केल्यानंतर प्रियकरानेही बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. 

दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या सुनिता चटप व गणेश थोरात याच्यांत प्रेमसंबंध होते. दोन दिवसांपूर्वी सुनिताला लग्नासाठी स्थळ आले होते. त्यामुळे गणेश थोरात अस्वस्थ झाला होता. आपला विवाह सुनितासोबत लावून देण्याबाबत त्याने वडील व मुलीच्या वडिलांना शुक्रवारी रात्री फोनवरून मागणी केली होती. मात्र सखाराम थोरात यांचे वडील सुर्यभान थोरात यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाल्याने पुर्ण विधी झाल्यावर लग्नाचे बघू असे गणेशच्या वडिलांनी त्यास सांगितले होते. 

शुक्रवारी रात्री मृत मुलाच्या घरी घरी भजनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात   सुनिताचे आई-वडील दिगंबर सोपान चटप व राजुबाई या गेल्या होत्या. यावेळी  सुनिता ही तिच्या अपंग भावासह घरातच होती. याचा फायदा घेत आरोपीने सुनिताला जवळपास हजार ते दीड हजार फुट अंतरावरील कापसाच्या शेतात ओढून नेले. त्यानंतर तिचा खून केला व नंतर घटनास्थळापासून दोन हजार फूट अंतरावर बोरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. सदर प्रकार हा एकतर्फी प्रेमातून झाल्याची चर्चा आहे.

घटनास्थळी युसुफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल आर एस वाघमारे, चाफळे पोलीस नाईक वाले, शिंदे, नाईक, यांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास केला.

सुनितास फोन द्या

या घटनेपूर्वी गणेश थोरात याने सुनिताचे वडील दिगंबर चटप यांच्या मोबाईलवर तीन ते चार वेळा फोन केला होता. यावेळी त्याने सुनितासोबत बोलायचे आहे तिला फोन द्या असे म्हटले. मात्र, सुनिताच्या वडिलांनी पुन्हा फोन करुन नकोस, असे सांगत फोन कट केला.