Wed, Jul 24, 2019 07:52होमपेज › Marathwada › जगाच्या शांतीसाठी बालयोगींचे १२ वर्षांचे अनुष्ठान

जगाच्या शांतीसाठी बालयोगींचे १२ वर्षांचे अनुष्ठान

Published On: Apr 13 2018 1:18AM | Last Updated: Apr 13 2018 1:18AMबीड : दिनेश गुळवे 

जगाचे कल्याण व्हावे, पाऊस भरपूर होऊन शेती पिकावी, सर्वसामान्यांचे दु:ख दूर व्हावे व जग सन्मार्गाला लागावे, यासाठी बीड तालुक्यातील तांदळवाडी येथे बालयोगी संत भगवान बाबा यांनी बारा वर्षांचे तप सुरू केले आहे. मागच्या एक वर्षापासून ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता वर्षातील सर्व ऋतुंमध्ये बालयोगी महाराज यज्ञसाधना करीत आहेत.

बालयोगी संत भगवान बाबा यांनी अनेक वर्ष हिमालयात साधना केली आहे. या साधनेदरम्यान त्यांनी योग अभ्यासही केला आहे. अनेक वर्ष हरिद्वार येथेही तप:साधना केली आहे. मागच्या वर्षीपासून बालयोगी संत भगवान बाबांनी तांदळवाडी हवेली येथे तप:साधना सुरू केली आहे. वर्षातील तिनही ऋतुमध्ये ते साधना करीत आहेत.

विशेष म्हणजे या बारा वर्षात वस्त्र न परिधान करण्याचा संकल्प त्यांनी केला आहे. दरवर्षी त्या ऋुतुंच्या वेळापत्रकानुसार त्यांची साधना होत असते. यावर्षीसाठीची साधना त्यांनी महाशिवरात्रीपासून सुरू केली आहे. बालयोगी महाराज अखंड बारा वर्ष तपोभूमी येथे साधना करणार आहेत. या साधने दरम्यान तपोभूमी येथे विविध धार्मिक कार्यक्रमही होत आहे.

जिवाची पर्वा न करता साधना 

हिवाळ्यामध्ये वस्त्र न घेता तर पावसाळ्यात एका पायावर उभा राहून ते साधना करतात. सध्या उन्हाळा असून ते दररोज सकाळी अकरा ते पाच या वेळेत यज्ञ पेटवून साधना करतात. या यज्ञात भडकता अग्नीतर असतोच शिवाय त्यांच्या भोवतालीही अग्नी तयार करून आतमध्ये बसून ते साधना करतात. या साधनेच्या काळात बारा वर्ष केवळ फलाहार ते घेणार आहेत. जगामध्ये सुख-शांती नांदावी, शेतकर्‍यांसह सर्वांचे कल्याण व्हावे, सर्वांच्या अंगी सद्गुण बाणावेत व सन्मार्गाने ईश्‍वराची आराधना करावी यासाठी त्यांनी ही साधना सुरू केली आहे. या साधना काळात येथे भाविकांची मोठी गर्दी होत आहे.