Thu, Jun 27, 2019 14:23होमपेज › Marathwada › पोलिसांनी तीन डॉक्टरांसह दोन नर्सचे घेतले जबाब

पोलिसांनी तीन डॉक्टरांसह दोन नर्सचे घेतले जबाब

Published On: May 24 2018 1:32AM | Last Updated: May 23 2018 10:31PMबीड : प्रतिनिधी 

येथील जिल्हा रुग्णालयात प्रसूतीनंतर खासगी रुग्णालयात दाखल झालेल्या मातेच्या बाळ बदल प्रकरणात बुधवारी जिल्हा रुग्णालयातील तीन डॉक्टरांसह बाळाला हाताळणार्‍या दोन नर्सचे जवाब शहर पोलिसांनी घेतले़  डॉक्टर व नर्सनी आपल्या जवाबात छाया थिटे यांनी मुलालाच जन्म दिला होता असे स्पष्ट केले़, दरम्यान चिमुकलीसह थिटे दाम्पत्याचे रक्तनमुने डीएनए चाचणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

छाया व राजू थिटे (रा. हिंगोली ह.मु.कुप्पा ता. वडवणी) हे दाम्पत्य कामासाठी मागील सात महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात वास्तव्यास आहे. 11 मे रोजी छाया यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी 4.45 वा. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतु वजन केवळ 1 किलो 500 ग्रॅम असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवले. त्यानंतर बीडच्या जिल्हा रुग्णालयात जन्मलेल्या त्या बालकास उचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्या बाळाला सुटी देताना आम्हाला मुलगा झाला होता, मात्र रुग्णालय मुलगी देत असल्याचा आरोप करत बाळाच्या नातेवाइकांनी बाळ ताब्यात घेण्यास नकार दिला होता, दरम्यान या प्रकारानंतर पोलिसांनी जिल्हा रुग्णालय व श्री बाल रुग्णालयात घेतलेल्या बाळाच्या पायांचे ठसे तपासणीसाठी रविवारीच ठसे तज्ज्ञांकडे पाठविले आहेत़  त्याचा अहवाल येणे बाकी आहे़  बुधवारी चिमुकली, छाया थिटे व राजू थिटे यांचे रक्तनमुने जिल्हा रुग्णालयात घेण्यात आले़  ते डीएनए चाचणी करण्यासाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत़

जिल्हाधिकार्‍यांनी घेतली माहिती

बाळ बदल प्रकरणानंतर बुधवारी जिल्हाधिकारी एम़  डी़ सिंह यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़  थोरात यांच्याकडून माहिती जाणून घेतली़  बाळ कमी वजनाचे असल्याने लिंगनिश्चिती करताना गडबड होऊ शकते़  वैद्यक शास्त्रातही तसे गृहित धरल्याचा संदर्भ डॉ़  थोरात यांनी दिला़, मात्र डीएनए चाचणी व ठसे तज्ज्ञांच्या अहवालानंतरच काय ते स्पष्ट होईल असे त्यांनी सांगितले.