Sun, Jul 21, 2019 01:34होमपेज › Marathwada › विद्यापीठात रसायनशास्त्र प्रयोगशाळा विद्यार्थी भरोसे

विद्यापीठात रसायनशास्त्र प्रयोगशाळा विद्यार्थी भरोसे

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 11 2018 12:54AMऔरंगाबाद : प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रयोगशाळेत विद्यार्थिनी भाजल्याच्या घटनेने प्रयोगशाळेतील निष्काळजीपणा व सुविधांच्या अभावाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुर्घटनेवेळी प्रयोगशाळा प्रमुखांसह एकही प्राध्यापक प्रयोगशाळेत नव्हता. घटनेनंतर सर्वजण धावत आले. या विभागाच्या प्रयोगशाळेत यापूर्वी स्फोट होऊन छताला छिद्र पडले होते. अधूनमधून दुर्घटना होत असूनही विभाग बोध घ्यायला तयार नसल्याचे कालच्या घटनेवरून दिसून येते. 

प्रयोगशाळेत प्रयोग करताना रासायनिक द्रव्याचा भडका उडून प्राजक्ता भताडे (वय 20) ही विद्यार्थिनी शुक्रवारी भाजली. तिच्यावर घाटीत उपचार करण्यात आले. प्राजक्ता प्रयोग करत असताना प्रयोगशाळेत ठोंबरे नावाचा संशोधक विद्यार्थी होता. प्रयोगशाळेचे प्रमुख प्रा. लांडे किंवा अन्य एकही प्राध्यापक तेथे नव्हता. विभागप्रमुख कॅप्टन सुरेश गायकवाड दौर्‍यावर होते. एकही प्राध्यापक नसताना विद्यार्थी प्रयोगशाळेत प्रयोग करतात कसे हा प्रश्‍न आहे. याबाबत कॅ. गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, प्रयोगशाळेत असे प्रकार घडत असतात. विद्यार्थिनीला किरकोळ भाजले आहे. मलमपट्टी करून तिला रुग्णालयातून ताबडतोब सुटी देण्यात आली. त्यामुळे हा फारसा गंभीर विषय नाही. प्रयोगशाळेत प्राध्यापक नसताना विद्यार्थी प्रयोग कसे करतात यावर तेथे संशोधक विद्यार्थी होता, असे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, प्रा. लांडे यांच्याशी संपर्क साधला असता, ते म्हणाले की, आपण वर्गावर असताना हा प्रकार घडला. माहिती मिळताच मी प्रयोगशाळेत धाव घेऊन विद्यार्थिनीला रुग्णालयात हलविले.