Sun, May 26, 2019 08:37होमपेज › Marathwada › मराठवाड्यातील आद्य ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ

मराठवाड्यातील आद्य ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ

Published On: Aug 20 2018 1:37AM | Last Updated: Aug 20 2018 8:23AMऔंढा नागनाथ : प्रभाकर स्वामी

देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेले हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील नागेश्‍वर नागनाथ हे आठवे ज्योतिर्लिंग आहे. मराठवाड्यातील आद्य ज्योतिर्लिंग म्हणून नागेश्‍वराची ख्याती आहे. प्राचीनकाळी हा प्रदेश दारूकावने या नावाने प्रसिद्ध होता. ऋषी मुनींना त्रस्त करून सोडणार्‍या दारूका राक्षसाचा वध करून स्वयं भगवान शंकराने याच ठिकाणी लिंगरूपाने वास्तव केल्याची आख्यायिका असल्याने अनेक शतकांपासून येथे भाविक दर्शनासाठी येत आहेत. 

बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हे उत्कृष्ट शिल्पकलेमुळे प्रसिद्ध आहे. मंदिराच्या भोवती 20 फूट उंचीचा तट असून चार प्रवेशद्वार आहेत. मुख्य मंदिर 126 बाय 118 फूट आहे. मंदिराच्या आतील वर्तुळाकार मंडप 8 खांबांनी तोल धरून आहे. त्याचे छत घुमटाकार असून, अष्टकोनी कलाकसुरीचे आहे. मंदिरावरील शिल्पात काही लक्षवेधक शिल्पे आहेत. यात शंकर-पार्वती कैलास पर्वतावर बसविलेले असून रावन पर्वत हलविण्याचा प्रयत्न करीत आहेत. भगवान विष्णूची दशावतारे कोरलेली आहे. अर्धनारी नटेश्‍वराच्या शिल्पात शंकर पार्वती, नटराजांना तांडव नृत्य करताना दाखविले आहेत. 

औंढा नागनाथ येथे प्राचीनकाळी फार मोठे अरण्य होते. या अरण्यात दारूका नावाचा राक्षस वास्तव्य करीत होता. या अरण्यात वास्तव्य करीत असलेल्या नागवंशीय जमातीस, ऋषीमुनींना, तपस्वींना तपस्येमध्ये अतिशय त्रास होऊ लागला, त्यामुळे भगवान शंकराने प्रकट होऊन राक्षसाचा वध केला अशी आख्यायिका आहे. 

तसेच दक्षराजाच्या यज्ञामध्ये भगवान शंकराला निमंत्रण दिले नाही म्हणून, पार्वतीने यज्ञात उडी घेतली म्हणून तिला सती म्हणतात. या सतीचा शोध घेण्यासाठी भगवान शंकर दंडाकारण्यामध्ये आले व या ठिकाणी कनकेश्‍वरी रूपाने पार्वती शंकराला भेटली अशी आख्यायिका आहे. तेच हे एक स्वयंभू शिवलिंग आहे. 

स्वयंभू शिवलिंग अनेक वर्ष जमिनीखाली होते. पांडव वनवासात असताना या वनात आले. त्यावेळी भीमाने एका ठिकाणी त्याची गाय दुधाच्या धारा जमिनीवर सोडत असल्याचे दिसून आले, त्यावेळी त्या जागी भीमाने गदेचा प्रहार केला, तेव्हा तेथे मोठा खड्डा पडून ज्योती स्वरूपात शिवलिंग प्रकट झाले. तेव्हा भीमाने या ज्योती स्वरूपाला पाच नद्यांची वाळू आणून पिंडीमध्ये बंद केले. म्हणून हे आत्मलिंग म्हणून ओळखले जाते. तसेच या ठिकाणी बांधलेले मंदिर हे पांडवकालीन आहे. पुढे पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराचा जीर्णोद्धार केला. हे शिवलिंग हरिहरात्मक रूपाचे आहे. त्यामुळे विष्णू आणि शिव या दोन्ही रूपात असल्याचे मानले जाते. या ठिकाणी विष्णू रूपात तुळस वाहण्याची प्रथा आहे. 

नागरूपाने असल्यामुळे नागेश्‍वर किंवा नागनाथ म्हणून या क्षेत्राची ओळख आहे. शिवलिंग पांडवांनी वाळूने तयार केल्यामुळे ते वालूकामय आहे. त्याची प्रभावळ पाषाणाची आहे. श्रावण सोमवार व महाशिवरात्रीस येथे मोठी यात्रा भरते.

औंढ्याला कसे जावे?

औंढा नागनाथ हे हिंगोली जिल्ह्यात असून, तालुका स्थान आहे. परभणी - हिंगोली  मार्गावर क्षेत्र वसले असून, नांदेड, परभणी, वसमत, हिंगोली येथून बस, खासगी वाहनांनी औंढ्याकडे जाता येते.