Thu, Jun 27, 2019 09:37होमपेज › Marathwada › राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा

राज्य सरकारकडून शेतकर्‍यांची थट्टा

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:00AMगेवराई : प्रतिनिधी

अस्मानी संकटाने शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. गारपीट, अवकाळी पावसाने शेतकर्‍यांचे लाखात नुकसान झाले असताना सरकार शेतकर्‍यांना हजारात तुटपुंजी मदत करून त्यांची थट्टा करतेय.  शेतकर्‍यांना हेक्टरी कमीत कमी 50 हजार मदत करून मदतीची केवळ घोषणा न करता त्याची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी गारपीटग्रस्त भागाची पाहणीदरम्यान शेतकर्‍यांशी संवाद साधताना केली. 

गेवराई तालुक्यात मागील आठवड्यात अवकाळी पावसासह मोठ्या प्रमाणात गारपीट झाली होती. यामध्ये शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. दरम्यान तालुक्यातील गारपिटीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी व शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी तालुक्यातील खळेगाव येथे काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्‍वजित कदम, खा. रजनी पाटील, माजी राज्यमंत्री सुरेश नवले, केजचे नगराध्यक्ष आदित्य पाटील, सभापती राजेसाहेब देशमुख, अशोक हिंगे, तहसीलदार संजय पवार, सुरेश हात्ते,  सुखदेव जमदाडे, सय्यद एजाज, महेश बेदरे आदीची उपस्थिती होती.

माणिकराव ठाकरे यांनीदेखील शेतकर्‍यांना संकटातून सावरण्यासाठी भरीव मदतीची गरज असून त्यासाठी पाठपुरावा करू असे आश्‍वासन शेतकर्‍यांना देत भाजप सरकार केवळ घोषणा करणारे सरकार आहे. प्रत्यक्षात मात्र शेतकरी वार्‍यावर आहे. त्यामुळे सरकारविरोधात जनतेत प्रचंड रोष असल्याचे त्यांनी सांगितले, तर खा.रजनी  पाटील म्हणाल्या की, भाजप सरकार नुसत्या घोषणा करत असून मदत देईल की नाही, याची हमी नाही; परंतु या शेतकर्‍यांना हेक्टरी 50 हजारांची मदत मिळवून देण्यासाठी आपण राज्यसभेत प्रश्‍न उपस्थित करणार आहे. यावेळी बोंडअळीची मदत अद्यापही आम्हाला मिळाली नसून याबाबत तुम्ही आवाज उठवावा तसेच अन्य मागण्यांचे निवेदन देत शेतकर्‍यांनी व्यथा मांडल्या.