Thu, Jun 27, 2019 09:46होमपेज › Marathwada › जाळ्या किती ठिकाणी लावणार?

जाळ्या किती ठिकाणी लावणार?

Published On: Feb 17 2018 2:07AM | Last Updated: Feb 17 2018 1:07AMबीड : प्रतिनिधी

राज्यात शेतकरी आत्महत्या सुरू असून त्या रोखण्यात सरकार अपयशी ठरत आहे. आत्महत्या रोखण्यासाठी मंत्रालयात जाळी लावली, मात्र शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी कोठे-कोठे जाळ्या लावणार ? असा सवाल माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी उपस्थित करत राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. 

बीडमधील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी ते बोलत होते. यावेळी खा. रजनी पाटील, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विश्‍वजित कदम, माणिकराव ठाकरे, काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष राजकिशोर मोदी, माजी आ. सुरेश नवले, सिराज देशमुख, अशोक हिंगे, संजय दौंड, दादासाहेब मुंडे यांची उपस्थिती होती. चव्हाण म्हणाले की, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शेती मालास दाम व बेरोजगारांच्या हाताला काम मिळणे आवश्यक आहे. पेट्रोल व डिझेलवर सेस, इतर कर लागत असल्याने इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात इंधनाचे दर अधिक आहेत. काँगे्रस पक्षाला अपेक्षित असा जीएसटी लागू झाला नाही. त्यामुळे व्यापार्‍यांसह सर्वसामान्यांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणुका आल्या की जीएसटीची टक्केवारी कमी करणे हा पर्याय नसून त्याचे स्लॅब पाडणे आवश्यक आहे. 

एनडीआरएफ ची हेक्टरी मदत 13 ते 18 हजार रुपये मिळते. मात्र जालना जिल्ह्यातील द्राक्षांच्या बागा गारपिटीने बाधित झाल्याने एका शेतकर्‍याचे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजले. बोंडअळी, गारपिटीमुळे शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.