Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Marathwada › कोल्हापूर,बेळगावच्या ‘आर्या गँग’वर मोक्का

कोल्हापूर,बेळगावच्या ‘आर्या गँग’वर मोक्का

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

बीड : प्रतिनिधी

कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यात खून, दरोडे, खंडणी यासारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे करून दहशत निर्माण करणार्‍या आर्या गँगवर बीड पोलिसांच्या प्रस्तावाआधारे मोक्का लावण्यात आला आहे. केज सराफ व्यापार्‍याला ठार मारून दागिने लुटल्यानंतर आर्या गँग बीड जिल्ह्यात चर्चेत आली होती. त्यानंतर बीड पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्यासहीत चार सदस्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर मोक्का लावण्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आला होता.

केज येथे दि. १४ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास सराफ व्यापारी विकास गौतम थोरात हे दुकान बंद केल्यानंतर दागिने सोबत घेऊन मोटारसायकलवरून गावाकडे निघाले होते. यावेळी कारमधून आलेल्या अमोल उर्फ संभाजी मोहिते (वय २६, रा. हसूर, ता. कागल, कोल्हापूर), अमर लक्ष्मण सुतार (वय ३९, रा. निपाणी, बेळगाव, कर्नाटक), महादेव रमेश डोंगरे (वय १९, सोनीजवळा, ता. केज) आणि अतुल रमेश जोगदंड (रा. सोनीजवळा, ता. केज) या चोघांनी थोरात यांना पाठीमागून धडक दिली आणि त्यांच्या जवळील दागिन्याची पिशवी घेऊन पळ काढला. या घटनेत थोरात यांचा जागीच मृत्यू झाला. मात्र, काही तरुणांच्या धाडसामुळे सदरील चारही आरोपी पोलिसांच्या तावडीत सापडले. हे सर्व आरोपी कुख्यात आर्या गँगचे सदस्य असून अमोल मोहिते हा टोळीचा म्होरक्या असल्याचे पोलीस तपासात समोर आले. तो नेहमी वेगवेगळ्या साथीदारांना सोबत घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात खून, दरोडे, चोर्‍या, घरफोड्या खंडणी आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असे. त्याच्यावर दोन्ही राज्यात एकूण २० गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे या टोळीवर केज येथे दाखल गुन्ह्यात महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम कलम 3(1)(ळळ), 3(2), 3(4) वाढविण्यासाठी केज ठाण्याचे पोलीस निरीक्षक हुंबे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांच्याकडे पाठविला होता. या प्रस्तावावर विचार होऊन भारंबे यांनी सदर टोळीवर मोक्का लावण्यास मंजुरी दिली. या संपूर्ण कारवाईत पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोर्‍हाडे, वैभव कलूबर्मे, उपअधीक्षक मंदार नाईक, गुन्हे शाखेचे निरीक्षक घनशाम पाळवदे, शिरीष हुंबे आणि केज पोलिसांची भूमिका महत्वाची ठरली.

Tag : arya gang, belgaum, kolhapu, beed,criminial, gang Maharashtra, Control of Organised Crime Act, beed pudhari news,


  •