Wed, Jan 23, 2019 04:28होमपेज › Marathwada › केक कापणारे अटकेत, हल्लेखोर फरार

केक कापणारे अटकेत, हल्लेखोर फरार

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMमाजलगाव : प्रतिनिधी 

येथील शहर पोलिस ठाण्यातील पोलिसांनी वाढदिवसाचा केक तलवारीने कापणारे आरोपी तत्काळ जेरबंद केले, मात्र तलवारीने माणसावर हल्ला करणारे आरोपी पाच दिवसांनंतरही सापडत नसल्याने पोलिसांच्या कर्तव्यावर नागरिकांतून प्रश्न चिन्ह निर्माण केले जात आहे. 

माजलगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यास शहर पोलिसांना अपयश येत असल्याचे सातत्याने घडणार्‍या घटनांवरून दिसून येत आहे. मटका, गुटखा,  जुगारासह अनेक अवैध व्यवसाय शहरातील चौका-चौकात राजरोस सुरू असल्याचे चित्र आहे. या धंद्यावर पोलिसांचा अंकुश आहे का? हा शोधाचा विषय आहे. 

काही दिवसांपूर्वी तरुणांनी तलवारीने वाढदिवसाचा केक कापला होता. या प्रकरणी संबंधित तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. येथे पोलिसांनी कर्तव्यदक्षता दाखविली. मात्र, पाच दिवसांपूर्वी तलवारीने हल्ला केल्याची घटना घडली होती. या प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर नागरिकांतून प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस ठाण्यातील मुद्देमाल चोरी गेल्याची फिर्याद पोलिस निरीक्षक मिर्झा बेग यांनी दिली होती. या गुन्ह्याचा तपासही अद्याप गुलदस्त्यात अडकला आहे. जर स्वत:च्या ठाण्यातील चोरीचा तपास पोलिस लावू शकत नाही, तर इतरांचे काय? असाही प्रश्‍न नागरिकांतून केला जात आहे. तालुक्यात अनेक ठिकाणी सुरू असलेले अवैध धंदे, चोरी व हल्ल्याच्या तपासाचा पोलिसांसमोर आव्हान आहे.