Thu, May 23, 2019 15:06
    ब्रेकिंग    होमपेज › Marathwada › 'शिक्षण विभागाचा सकाळचा जी.आर.रात्री नसतो' 

'शिक्षण विभागाचा सकाळचा जी.आर.रात्री नसतो' 

Published On: Feb 18 2018 3:28PM | Last Updated: Feb 19 2018 1:22AMअंबाजोगाई : प्रतिनिधी 

राज्याच्या शिक्षण विभागाने सकाळी  काढलेला  जी.आर.दुपारी बदलतो अन रात्री मागे घेतला जातो. आत्तापर्यंत शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 536 जी.आर.काढून विक्रम केला. कुठलाही जी.आर. विद्यार्थी, शिक्षक, शाळा अथवा संस्थेच्या  हिताचा नसल्याची  टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे आमदार विक्रम काळे यांनी केली. आ.काळे अंबाजोगाई येथील योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या शताब्दी महोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या सांगता समारोह प्रसंगी बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, नोकरीसाठी आवश्यक असलेल्या टी. ई.टी.परीक्षा फी च्या माध्यमातून शासनाच्या तिजोरीत 132 कोटी रुपये जमा झाले आहेत. परंतु शासन नोकरभरती करत नाही. नोकरभरतीच करायची नसेल तर परीक्षा कशाला घेता? असाही सवाल त्यांनी केला. शिक्षण क्षेत्रात असंतोष पसरला आहे. संस्था बंद पाडून बहुजनांचे शिक्षण मोडीत काढण्याचं काम शासन करत असल्याने सावळा गोंधळ सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.

लातूर ग्रामीण मतदार संघाचे राष्ट्रीय कॉग्रेसचे आमदार त्र्यंबक भिसे यांनीही आपल्या भाषणात  शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या कारभारावरावर टीका केली. रोज एक जी.आर.काढून शिक्षण मंत्री तावडेंनी शिक्षणाचा विनोद केला असल्याचे ते म्हणाले. सर्व कांही ऑनलाईन असले तरी कारभार ऑफ लाईन आहे. अनेक वर्षांपासून भाजपा सत्तेत नव्हती त्यामूळे शासन कसे चालवायचे हेच त्यांना  कळत नसल्याचे आ.भिसे म्हणाले.