होमपेज › Marathwada › निरीक्षणातून साहित्याची निर्मिती

निरीक्षणातून साहित्याची निर्मिती

Published On: Dec 25 2017 1:19AM | Last Updated: Dec 24 2017 10:32PM

बुकमार्क करा

अंबाजोगाई  : प्रतिनिधी

साहित्याची निर्मिती अवतीभवतीच्या व समाज निरीक्षणातून होत असते. साहित्य निर्माण करण्यासाठी अभिव्यक्तीची गरज असते, असे मत बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री ना. पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.

त्या अंबाजोगाई येथे बीड जिल्हा परिषद शिक्षण विभाग व मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या 39 व्या दोनदिवसीय मराठवाडा साहित्य संमेलनात बोलत होत्या. ना. मुंडे यांच्या हस्ते रविवारी योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या प्रांगणात उद्घाटन झाले. यावेळी संमेलनाध्यक्ष प्रा. रंगनाथ तिवारी, स्वागताध्यक्ष राजेसाहेब देशमुख, खा. रजनीताई पाटील, माजी राज्यमंत्री सुरेश धस, रमेशराव आडसकर, आ. संगीता ठोंबरे, नगराध्यक्षा रचनाताई मोदी, माजी आ. उषा दराडे, अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अक्षयकुमार काळे, कौतिकराव ठाले-पाटील, सभापती शोभा दरेकर, साहित्यिक भास्कर बडे, उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, तहसीलदार संतोष रूईकर, राम कुलकर्णी, डॉ. विजय कराड, कार्यवाह  दगडू लोमटे, मसापचे अध्यक्ष अमर हबीब उपस्थित होते.ना. मुंडे आपल्या बीज भाषणात म्हणाल्या की,  माणूस आठवणीत जगत असतो. आठवणींना समाजासमोर मांडण्याचे साधन म्हणजे साहित्य संमेलन होय. पुढील पिढीसाठी साहित्य संमेलने होणे फार आवश्यक आहे. साहित्यासाठी आवश्यक असलेली भाषा व अभिव्यक्ती या भिन्न बाबी आहेत. त्याचप्रमाणे साहित्य समजण्यासाठी उंची व ज्ञान लागते. साहित्यामधून ज्ञानाच्या कक्षा रूंदावत असतात. मराठीतला भाव कळल्यास भाषेत गोडवा निर्माण होत असतो. वि.स. खांडेकर, पु.ल. देशपांडे, प्र.क.अत्रे या लेखकांच्या साहित्यातून खूप शिकायला मिळते. 

मसापचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांनी आपल्या भाषणात मराठी भाषेचा आणि अंबाजोगाईचा एतिहासिक संदर्भ लक्षात घेऊन या 39 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व असल्याचे सांगितले.  

उद्घाटन सोहळ्यात साहित्य संमेलनानिमित्ताने काढण्यात आलेल्या ‘वाटचाल’  स्मरणिका,  “संत कवी विष्णुदास’’ विशेषांक आणि वि. अं. कानोले लिखित ‘मुकुंदराजाची अंबानगरी कोणती?’ या पुस्तकांचे प्रकाशन झाले. 

प्रास्ताविक मराठवाडा साहित्य संमेलनाचे कार्यवाह दगडू लोमटे यांनी केले. सूत्रसंचालन योगीराज माने, तर आभार वैशाली जोशी यांनी मानले. या कार्यक्रमास  मराठवाड्यातील नामवंत साहित्यिक, साहित्यप्रेमी, रसिक, बीड जिल्हा परिषदेतील तसेच संस्थेतील  शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. फ