Tue, Jun 18, 2019 21:18होमपेज › Marathwada › चंद्रकांत पाटलांनी खुशाल कर्नाटकात जावे : अजित पवार

'चंद्रकांत पाटलांनी खुशाल कर्नाटकात जावे'

Published On: Jan 22 2018 4:01PM | Last Updated: Jan 22 2018 4:25PMहिंगोली : प्रतिनिधी

सीमा भागात कर्नाटक सरकारकडून मराठी भाषकांवर होणार्‍या अन्यायाविरोधात महाराष्ट्रात तीव्र संताप असताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकात जावून कर्नाटकाचा गौरव केला. हा मराठीचा द्वेष असून, मराठी जणांच्या भावनांवर मीठ चोळणारा प्रकार आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा. नसता मुख्यमंत्र्यांनी त्यांची हकालपट्टी करावी, अशी जोरदार मागणी करीत आमदार अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाना साधला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित हल्‍लाबोल यात्रा सोमवारी हिंगोलीत दाखल झाली. येथील गांधी चौकात दुपारी ११.३० च्या सुमारास आयोजित सभेत राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभेला संबोधित केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या चित्राताई वाघ यांच्यासह स्थानिक पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती. 

यावेळी पवार यांनी राज्य व केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाचा समाचार घेतला. तेलंगणा राज्यात शेतकर्‍यांना चोवीस तास वीज मोफत दिली जाते. तर महाराष्ट्र का नाही? असा सवाल उपस्थित करून अडचणीत सापडलेल्या शेतकर्‍यांना राज्य शासनाने मदत करावी, अशी भूमिका घेतली. हल्‍लाबोल यात्रेच्या माध्यमातून झोपलेल्या सरकारला जागे करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असून हल्‍लाबोल यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्य शासनाने शेतकर्‍यांची सरसकट कर्जमाफी करावी, शेतकर्‍यांच्या मालाला हमीभाव द्यावा, शिष्यवृत्ती पूर्ववत कराव्यात आदी मागण्या त्यांनी केल्या. 

नुकतेच महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्नाटकात जावून कर्नाटकचे गौरव गीत गात मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेला आव्हान देणार्‍या चंद्रकांत पाटलांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी यावळी केली. त्यांना कर्नाटक राज्याची एवढी हौस असेल त्यांनी खुशाल राजीनामा देवून कर्नाटकात जावे, परंतु महाराष्ट्रातील जनतेच्या अस्मितेला बाधा घालू नये. महाराष्ट्राची अस्मिता जोपासावी अन्यथा राज्यातील जनता त्यांना माफ करणार नाही, अशी टीका त्यांनी केली.