Thu, Jun 20, 2019 14:40होमपेज › Marathwada › ‘भाजपचे निवडणूक चिन्ह गाजर हवे’

‘भाजपचे निवडणूक चिन्ह गाजर हवे’

Published On: Jan 16 2018 7:31PM | Last Updated: Jan 16 2018 7:31PM

बुकमार्क करा
उस्मानाबाद : प्रतिनिधी

शेजारच्या तेलंगणा राज्यात शेतकर्‍यांना मोफत वीज मिळत असताना, मराठवाड्यातील शेतकर्‍यांची वीज राज्य सरकार तोडत आहे. मराठवाड्याला सापत्नभावाची वागणूक दिली जात आहे. कर्जमाफीतही शेतकर्‍यांची फसवणूक करणार्‍या भाजपचे निवडणूक चिन्ह आता ‘गाजर’च हवे, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री, आ. अजित पवार यांनी फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. 
राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यातील दुसर्‍या टप्प्यात हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात काढली. मंगळवारी तुळजाभवानी मंदिरात देवीचे आशीर्वाद घेतल्यानंतर यात्रा साडेबाराच्या सुमारास उस्मानाबादेत आली. त्यानंतर लेडिज क्लब येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला. मोर्चात खा. सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मा. खा. डॉ. पद्मसिंह पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आ. दिलीप वळसे-पाटील, आ. नवाब मलिक, चित्रा वाघ, आ. जयदत्त क्षीरसागर, आ. राणाजगजितसिंह पाटील, आ. राहुल मोटे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अर्चना पाटील आदींसह सर्व प्रमख पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते.

आ. पवार म्हणाले की, शेतकर्‍यांबरोबरच सर्व समाज घटकांनाही फसवण्याचे काम सरकारने केले. आम्ही मराठा, मुस्लिम समाजाला आरक्षण दिले. तेही यांना टिकवता आले नाही. यांना शिवाजी महाराजांची, डॉ. आंबेडकरांची आठवण केवळ निवडणुकांपुरतीच येते. त्यामुळे अरबी समुद्रातील शिवस्मारक व इंदूमिल येथील बाबासाहेबांचे स्मारक रखडले आहे. हे लबाड सरकार आहे.
आ. मुंडे म्हणाले की, आम्ही सर्वांनी आज ‘चोरांची सत्ता अलथवण्याची ताकद दे,’ अशी मागणी देवीचरणी केली. आ. पाटील यांनी, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी जिल्ह्यात येऊन प्रचारादरम्यान दिलेली आश्‍वासने, बैठकीत घेतलेल्या निर्णयांची चित्रफीत दाखवून दोन्ही नेत्यांवर फसवणूक केल्याप्रकरणी टीका केली.

यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. विविध मागण्यांचे फलक हाती घेऊन तरुणही उत्साहाने घोषणा देत होते. राष्ट्रीय समाज पक्षाचे कोषाध्यक्ष किशोर मासाळ, नाशिक जिल्ह्यातील संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आ. पाटील यांनी प्रास्ताविक केले, आ. मोटे यांनी आभार मानले. सभेनंतर सर्व नेत्यांनी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन दिले.

तत्पूर्वी, सकाळी तुळजाभवानी दर्शनानंतर शहाजीराजे महाद्वारासमोर देवीचा पारंपरिक गोंधळ घालण्यात आला. नेते मंडळींच्या हस्ते मांडलेल्या चौकाची विधिवत पूजा करून गोंधळास प्रारंभ करण्यात आला. यात देवीच्या पारंपरिक गोंधळगीताच्या कवनासह सरकारवर टीका करणारी कवने गाऊन सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. यात 21 टीएमसी पाणी प्रश्‍न, रेल्वे, दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यासाठी जाहीर केलेले पॅकेज, कर्जमाफी, नोटाबंदी, जीएसटी यासह अनेक प्रश्‍न आणि समस्यांवर गोंधळी कलावंतांनी कवने रचून गायिली. 

तुळजापुरातील देवीचे पारंपरिक गोंधळी, उस्मानाबाद जिल्हा गोंधळी समाजाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंधळी आणि त्यांचे 11 सहकारी यांनी पारंपरिक वेशभूषेत गोंधळ घातला.