Thu, Jul 18, 2019 02:16



होमपेज › Marathwada › 43 वर्षांनंतर जळगावाचे विमान उडाले!

43 वर्षांनंतर जळगावाचे विमान उडाले!

Published On: Dec 24 2017 10:06AM | Last Updated: Dec 24 2017 10:06AM

बुकमार्क करा





जळगाव : प्रतिनिधी

जळगावात 43 वर्षांपूर्वी विमानतळ बांधण्यात आला. त्याचे उद्घाटन माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते. त्यानंतर या विमानतळावरून विमान उडालेच नाही. त्याच्या प्रतीक्षेत संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील नागरिक व उद्योजक होते. अखेर शनिवारी (दि.23) दुपारी 4 वाजता एअर डेक्‍कन कंपनीचे विमान जळगाव विमानतळावर आले आणि 45 मिनिटांनी म्हणजे 4.50 वाजता त्याने मुंबईकडे प्रयाण केल्यानंतर जळगावकरांच्या आनंदाला पारावार उरला नाही. उडान या संकल्पनेतून ही सेवा सुरू झाली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील याच विमानाने जळगावला आले आणि याच विमानाने मुंबईकडे प्रयाण केले. या विमान सेवेचे प्रमुख कॅप्टन गोपीनाथन यांनी आम आदमी योजने बद्दल माहिती दिली. आठवड्यातून तीन दिवस एक रुपयात विमान प्रवास सुद्धा असणार आहे.

जैन ग्रुपचे व्हाईस प्रेसिडेंट अतुल जैन यांनी आपल्या कंपनीकडून येत्या तीन महिन्यांचे 25 टक्के आरक्षण केले. पहिल्या महिन्याचा धनादेश सुद्धा दिला. विमानसेवा सुरू होणार म्हणून प्रशासनाने संपूर्ण तयारी केली होती. शहरातील मान्यवर व्यक्‍ती, उद्योजक, आमदार, खासदार वेळे आधी विमानतळावर आले होते. मात्र, दुपारी 1.30 वाजता येणारे विमान उशिराने येणार असल्याचे समजताच आमदार, नागरिकांनीसुद्धा विमानतळावरून काढता पाय घेतला. अखेर दुपारी 4 वाजता विमानाचे आगमन जळगाव विमानतळावर झाले. त्यातून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कॅप्टन गोपीनाथन् उतरले. त्यांचे स्वागत राज्य सहकार मंत्री गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. यावेळी खा. ए. टी. नाना पाटील, आ. स्मिता वाघ, आ. चंद्रकांत सोनवणे उपस्थित होते. ही विमानसेवा सुरू करण्यामध्ये महाराष्ट्र एअरपोर्ट विकास प्राधिकरणाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.