Mon, Jul 22, 2019 00:34होमपेज › Marathwada › अधिकमासाकडे जावयांची नजर

अधिकमासाकडे जावयांची नजर

Published On: May 09 2018 2:02AM | Last Updated: May 08 2018 8:42PMआष्टी : सचिन रानडे 

अधिकमास म्हणजे जास्तीचा महिना. या अधिकमासात जावयास वाण देण्याची प्रथा आहे. त्यामुळे हा महिना आल्यानंतर जावयांना सासुरवाडीचे वेध लागतात तर जावयास काय वाण द्यावे? याचे टेन्शन सासरवाडीच्या मंडळींना असते.

शक संवत्सरात 355 दिवस, तर इंग्रजी वर्षात 365 दिवस असतात. त्यासाठी शास्त्रकारांनी अधिकमास ठरविला आहे. दर तीन वर्षांनी (32 महिने 16 दिवसांनी ) या अधिकमासाचे आगमन होते. सूर्य प्रत्येक महिन्यास एक राशीचे संक्रमण करतो, तसेच या अधिकमासात जावयाची चांदी असते. अधिकमासात मुलगी आणि जावयाला वाण देण्याची पद्धत आहे. गेल्या काही वर्षात या वाण देण्यामध्ये काही बदल झाले असले तरीही पारंपरीक गोष्टी जपल्या जात असल्याचे दिसून येते. सोने, चांदी असो वा एखादी वस्तू देण्याबरोबर कपडेही आवर्जून दिले जातात. त्यामुळे कपडे आणि साड्यांचे मार्केट सध्या तेजीत आहे. त्यातच लग्नसराईची खरेदी करणारे आता अधिकमासात येणार्‍या जावयांचा पाहुणचाराची खरेदी देखील यातच करत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बाजारपेठेत वर्षभरात होत असलेली उलाढाल याच काळात होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कापड बाजारात चांगले वातावरण आहे.

काळ बदलला तशी लोकांशी राहणीमानाची पद्धतही बदलली, मात्र संस्कृती जपण्यासाठी आजही काही पद्धतीं पाळल्या जातात. त्यामध्येच जावई आणि मुलीला अधिकामासाचा वाण देण्याबरोबर कपडे दिले जातात. घरातील व्यक्तींनाही आवर्जून कपडे केले जातात. या सगळ्या खरेदीच्या माहोलामुळे कापड बाजारात मोठ्या प्रमाणावर उलाढाल होत आहे. साड्या, लहान मुलांचे कपडे, शर्टिंग, सुटींग सोबतच रेडीमेड कपड्यांनाही मागणी वाढली आहे.