होमपेज › Marathwada › आरोपींच्या आधारकार्डने होतेय पोलिसांची दिशाभूल

आरोपींच्या आधारकार्डने होतेय पोलिसांची दिशाभूल

Published On: Jul 09 2018 1:04AM | Last Updated: Jul 09 2018 1:04AMबीड : शिरीष शिंदे

गुन्हा करताना आरोपींनी वापरलेल्या मोबाइल व सिमकार्डची माहिती पोलिस घेतात. सिमकार्ड खरेदी करताना आरोपींनी दिलेले आधार कार्डवरील पत्त्यावर जाऊन चौकशी केली असता आधार कार्डवरील पत्ता बनावट असल्याचे तपासी अधिकार्‍यांच्यासमोर येत आहेत. परिणामी मोठे गुन्हे करणारे आरोपींचा शोध रखडत चालला असल्याचे समोर आले आहे. 

कोणताही गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांचा तपास उलट दिशेने सुरू होतो. आरोपींनी वापरलेला पोषाख, गुन्ह्यासाठी वापरलेली मोडस ऑपरंडी यासह आदीबाबी लक्षात घेऊन पोलिस अधिकारी तपासाला सुरुवात करतात. आजकाल, गुन्हा करताना आरोपींनी वारलेल्या मोबाइलचे लोकेशन घेतले जाते. आरोपींनी सिमकार्ड घेताना कोणती कागदपत्रे दिली आहेत, त्याची माहिती घेतली जाते. सर्व साधारणपणे आधारकार्ड हे सर्वांकडे उपलब्ध असल्याने आरोपींनीही आधार कार्डवरच सिमकार्ड घेतल्याचे दिसून येते, मात्र तपासी अधिकारी हे आरोपीने सिमकार्ड खरेदी करताना दिलेल्या आधार कार्डच्या पत्त्यावर गेले असता त्या ठिकाणी कोणीच रहात नसल्याचे समोर येते. यामुळे पोलिसांचा तपास सुरू होताच थांबतो. त्यामुळे अधिकार्‍यांना पुन्हा नव्याने गुन्हा तपासणीला सुरुवात करावी लागते.