Fri, Sep 20, 2019 05:31होमपेज › Marathwada › लातूर : बस-ट्रक अपघातात तिघे ठार

लातूर : बस-ट्रक अपघातात तिघे ठार

Published On: Dec 03 2017 1:08AM | Last Updated: Dec 03 2017 1:08AM

बुकमार्क करा

लातूर : प्रतिनिधी

पहिल्या दोन भीषण अपघातांच्या जखमा ओल्या असतानाच निलंगा- लातूर मार्गावर चलबुर्गा पाटीनजीक शुक्रवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास पुन्हा भरधाव वेगातील ट्रक व एस.टी. बसची समोरासमोर धडक झाली. त्यात 3 जण जागीच ठार, तर 8 प्रवासी गंभीर जखमी झाले. जखमींवर लातूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

शुक्रवारी रात्री 11.10 वाजता लातूर बसस्थानकातून हैदराबादला जाण्यासाठी लातूर आगाराची बस (एमएच 20 - बीएल 3587) निघाली. ती चलबुर्गा पाटीनजीक आली असता तिची व ट्रकची (एपी 24 - व्ही 8838) समोरासमोर जोराची धडक झाली. ही धडक एवढी जोरात होती की एका बाजूचा बसचा पत्रा कापला गेला. त्यात बसमधील अंकिता अमित भोज (वय 22, रा. निलंगा), आयेशा इस्माईल बागवान (50, रा. हैदराबाद), बापूसाहेब बिडवे (50, रा. अडसूळ, ता. कळंब) हे जागीच ठार झाले, तर अमित रामकृष्ण भोज (40, रा. निलंगा), मोहम्मद इस्माईल बागवान (55, रा. हैदराबाद), सोनू किसन काळे (18, रा. ढोकी), किशोर गोरख डोंगरे (40, रा. उदगीर), ओमप्रकाश जगन्‍नाथ पाटील (35, रा. यल्लोरी, जि. लातूर), सुनील सतीश शिंदे (10, रा. ढोकी, जि. उस्मानाबाद), अनिस मन्सूर शेख (35 , रा. लातूर) व अन्य एक जखमी झाले.

अपघाताची माहिती कळताच चलबुर्गा पाटीवर असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बाहेर काढले. औशाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश किंद्रे, लातूर ग्रामीणच्या उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया पाटील, स.पो.नि. हनुमंत बांगर, भोसले व पोलिस कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. 108 रुग्णवाहिकांनी जखमींना लातूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.


 

WhatsApp वर बातम्या मिळवण्याकरीता ८८०५००७७२२ हा नंबर तुमच्या मोबईलमध्ये पुढारी या नावाने सेव्ह करा आणि खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुप जॅाईन करा.
https://chat.whatsapp.com/DmOJLDvGACrHCXh0bqURex