Mon, Jun 17, 2019 03:15होमपेज › Marathwada › लातूर : आपच्या कार्यकर्त्याला पोलिसाची बेदम मारहाण

लातूर : आपच्या कार्यकर्त्याला पोलिसाची बेदम मारहाण

Published On: Jan 31 2018 6:12PM | Last Updated: Jan 31 2018 6:12PMलातूर: प्रतिनिधी

लातुरमध्ये आपचे कार्यकर्ते अमित पांडे यांना  एका पोलिसाकडून बेल्टने बेदम मारहाण करण्यात आली आहे. मंगळवारी रात्री गांधी चौक पोलिस ठाण्यात ही घटना घडली. फरमान बारब्बा असे पोलिस कर्मचाऱ्याचे नाव असून त्याच्याविरुध्द गांधी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्यानेही पांडे यांच्याविरुध्द शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल तक्रार दिल्याने पांडेवरही गुन्हा नोंद झाला आहे. दिल्लीत आप कार्यकर्त्यांवर झालेल्या  लाठीचार्जच्या  निषेधार्थ लातूर आपच्यावतीने मंगळवारी गांधी चौकात निदर्शने करण्यात आली होती. निदर्शने लवकर करा म्हणून पोलिसांनी कार्यकर्त्याना सुनावले होते. निदर्शने पार पडल्यानंतर लातूर ग्रामीण विधानसभा निरीक्षक अमित पांडे (वय३४) हे ठाण्यात गेले व त्यांनी पोलिस कर्मचारी फरमान यांना त्यांचे नाव विचारले त्यावेळी फरमान यांनी त्यांना बेल्ट व सुंदरीने बेदम मारहाण केली. यामध्ये ते जखमी झाले. त्यानंतर पांडे यांना ठाण्यातील एका खोलीत पोलिसांनी बसवून ठेवले. दरम्यान या घटनेचा महाराष्ट्र आपच्या प्रिती शर्मा मेनन यांनी निषेध केला असून संबंधित पोलिस कर्मचाऱ्याला निलंबीत करावे, असे टिवीट त्यांनी केले आहे.