Thu, Apr 25, 2019 18:29होमपेज › Marathwada › ऊसतोड मजुरांच्या तालुक्यात घडतेय शैक्षणिक क्रांती 

ऊसतोड मजुरांच्या तालुक्यात घडतेय शैक्षणिक क्रांती 

Published On: Feb 11 2018 12:55AM | Last Updated: Feb 10 2018 9:37PMशिरूर : प्रतिनिधी

शैक्षणिक क्षेत्रात जिल्हा परिषदेच्या शाळा व त्यावर काम करत असलेले शिक्षक जन माणसात विश्वास संपादन करत आहेत. या शाळा संस्थेच्या शाळांना पिछाडीवर टाकून  डिजिटल, आयएसओ मानांकन प्राप्त करून थेट दिल्ली दरबारीही शिरूरचा नावलौकिक गाजवला आहे.   

ऊसतोड मजुरांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या या तालुक्यातील शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांबरोबर आपण स्पर्धा करण्याबाबताचा गमावालेला विश्वास पुन्हा मिळवण्यात यशस्वी होत आहेत.  
शिरूर कासार तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेची संख्या 183 असून 102 शाळा डिजिटल पूर्ण झालेल्या आहेत. 30 ते 35 शाळा डिजिटल प्रक्रिया पूर्ण करण्याच्या तयारीत आहेत त्या तुलनेत संस्थेच्या शाळांची संख्या 45 असून डिजिटल मात्र 15 शाळा झाल्या असल्याची शिक्षण विभागाकडून देण्यात आली. 

टक्केवारीच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या शाळा पुढे असल्याचे यावरून दिसून येते. ग्रामीण भागात असलेल्या  गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत जवळपास 11 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले पालक त्याच बरोबर संस्था चालकाशी असलेले संबंध व जिल्हा परिषदे पेक्षा संस्थेचा दर्जा चांगला असा समज केल्याने सतत जिल्हा परिषदेच्या शाळा बाबत फारसे चांगले बोलले जात नव्हते मात्र आता हा सारा आक्षेप धुडकावत जिल्हा परिषदेच्या शाळांनी चांगलीच भरारी घेऊन शैक्षणिक क्षेत्रात आत्मविश्वास दाखवून दिला. 
लोकसहभागाने यश

जिल्हा परिषदेच्या शाळांना डिजिटल प्रक्रिया पूर्ण करताना अनंत अडचणींना सामोरे जावे लागले. त्यात वीज, इंटरनेट कनेक्शन, जाग्याचा अभाव असणार्‍या खोल्यांची दुरवस्था दूर करण्यासाठी अथक प्रयत्न करावे लागले. त्यासाठी शिक्षकांनी ग्रामवासियांना एक नवा विश्‍वास देऊन लोकवाटा चळवळ यशस्वी पणे सुरू करून लाखोंचा निधी शाळेसाठी जमा करून शाळेच्या गरजा पूर्ण केल्या. आपण दिलेला पैसा शिक्षकाकडून शाळेसाठीच खर्च होत असल्याची खात्री पटली आहे.

सक्षमपणे सांभाळली धुरा

पूर्ण वेळ गटशिक्षणाधिकारी नसताना पदभार सांभाळणार्‍या शेख जमीर यांनी  जिल्हा परिषदेच्या शाळेचा शैक्षणिक आलेख उंचावला  आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना मुख्यध्यापक, शिक्षक, शालेय शिक्षण व्यवस्थापन समिती, शिक्षणप्रेमी यांच्या सहकार्यामुळेच हे काम करणे शक्य झाल्याचे शेख जमीर यांनी सांगितले. आता जिल्हा परिषद शाळातील पटसंख्या वाढविण्याचे आवाहन तालुक्यातील शिक्षकांसमोर आहे.

स तालुक्यात 21 शाळांना आयएसओे मानांकन प्राप्त असले तरी त्यातसुद्धा तब्बल 16 जिल्हा परिषद शाळेचा समावेश आहे. त्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दहिफळेवस्ती, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मातोरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खोपटी, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा खोकरमोह, तर आयएसओ मानांकन प्राप्त म्हणून जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाच्या शासकीय निवासी शाळेने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला त्याही पुढे याच शाळेने स्वच्छ शाळा म्हणून राजधानीत दिल्लीत शिरूर तालुक्याचे नाव गाजवले.