Wed, May 22, 2019 14:56होमपेज › Marathwada › उसनवारी कर्मचार्‍यांवर सुरू कारभार

उसनवारी कर्मचार्‍यांवर सुरू कारभार

Published On: Feb 06 2018 1:47AM | Last Updated: Feb 05 2018 10:12PMपरभणी : दिलीप माने 

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागात आजही अंतर्गत असणार्‍या विविध संस्थांवरील कर्मचार्‍यांना पाचारण करून रिक्‍त जागांवर कामासाठी नियुक्‍ती दिली आहे. यामुळे त्या-त्या संस्थेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून शासनाच्या नियमाला तिलांजली मिळत आहे. 

समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. याकरिता सदरील विभागासाठी शासन स्तरावरून एकूण 16 पदे मंजूर आहेत, पण सेवक वगळता 7 कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत. यात अनेक संस्थांतील कर्मचार्‍यांना अधिकारी व संस्थाचालक यांच्या हातमिळवणुकीतून या विभागात कर्तव्यावर पाठविण्यात आले आहे. या कर्मचार्‍यांच्या नियुक्त्या करण्याबाबत शासनाचे कुठलेही आदेश नाहीत. शासनाने संस्थेचे कर्मचारी इतरत्र कामकाजासाठी पाठविण्याकरिता निर्बंध लादले आहेत. पण मागील 3 वर्षांपासून या विभागात या कर्मचार्‍यांची नियुक्‍ती कोणत्या आधारावर करण्यात आली, याची चौकशी होणे गरजेचे आहे.

समाज कल्याणकडील योजना

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाच्या वस्तीचा विकास करणे, शाहु, फुले,आंबेडकर दलितवस्ती विकास व सुधारणा अभियान, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षण फी परीक्षा फी प्रदाने, माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती, खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांना शिक्षण शुल्क फी प्रतिपूर्ती, अस्वच्छ व्यवसाय करणार्‍या पालकांच्या मुलांना शिष्यवृत्ती, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना, इ. 9 वी व 10 वी मध्ये शिकत असलेल्या अनु. जातीच्या विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती, औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अनु. जातीच्या प्रशिक्षणार्थींना विद्यावेतन, आंतरजातीय विवाहास प्रोत्साहन व अर्थसहाय्य, मागासवर्गीय वसतिगृहांना परिपोषण अनुदान प्रदाने, अपंग शाळा, शालांत पूर्व शिक्षण घेण्यार्‍यांना अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना, अपंग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल योजना, अपंग-अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याची योजना,अपंग व्यक्तींना कृत्रिम अवयव व साधने,उपकरणे पुरविणे योजना, अनसूचित जातीच्या मुलामुलींसाठी आश्रमशाळा योजना राबविल्या जातात.