Sun, May 26, 2019 20:37होमपेज › Marathwada › जिल्हा परिषदेत रिक्‍त जागा वाढल्याने कामे खोळंबणार

जिल्हा परिषदेत रिक्‍त जागा वाढल्याने कामे खोळंबणार

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:11PMहिंगोली : प्रतिनिधी

येथील जिल्हा परिषदेमध्ये अधिकार्‍यांच्या रिक्‍त जागांची संख्या वाढू लागल्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात लोकप्रतिनिधी कमी पडत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. रिक्‍त पदे वाढल्याने कामे खोळंबणार असल्याचे बोलले जात आहे.येथील जिल्हा परिषदेचे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख यांची जालना येथे बदली झाली. त्यांच्या बदलीचे आदेश बुधवारी शासनाने काढले आहे. त्यांच्या बदलीमुळे अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी पदासोबतच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक पदही रिक्‍त झाले आहे. दरम्यान, यापूर्वी स्वच्छ भारत अभियानाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली कोतवाल यांची बदली झाली. त्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी तृप्‍ती ढेरे यांची बदली झाली.

त्यानंतर मागील पंधरा दिवसांपूर्वीच सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश घुले यांची बदली झाली आहे. आता देशमुख यांची बदली झाल्याने रिक्‍त जागांमध्ये आणखीनच भर पडली आहे. सध्या स्वच्छ भारत मिशनचा पदभार हिंगोलीचे गटविकास अधिकारी आत्माराम बोंद्रे यांच्याकडे, सामान्य प्रशासन विभागाचा पदभार पंचायतचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ यांच्याकडे तर महिला बाल कल्याण विभागाचा पदभार बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश वाघ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. परंतु आता अधिकारीच नसल्याने अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक म्हणून पदभार द्यावा तरी कोणाकडे असा प्रश्‍न वरिष्ठ अधिकार्‍यांसमोर उभा राहिला आहे. जिल्हा परिषदेमधून अधिकार्‍यांच्या बदल्या होत असताना लोकप्रतिनिधी मात्र मूग गिळून गप्प आहे. जिल्ह्यात सत्ताधारी व विरोधी पक्षाचे आमदार असतानाही रिक्‍त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावाच केला जात नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींविरुद्ध तीव्र असंतोष निर्माण झाल्याचे चित्र आहे. एकंदरीत जिल्हा परिषदेमधील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या रिक्‍त जागामुळे कामाचा खोळंबा होणार हे मात्र खरे आहे.