Wed, Mar 27, 2019 05:58होमपेज › Marathwada › जि.प.च्या इमारतीचे २५ टक्के काम अपूर्ण

जि.प.च्या इमारतीचे २५ टक्के काम अपूर्ण

Published On: May 21 2018 1:18AM | Last Updated: May 21 2018 1:18AMपरभणी : नरहरी चौधरी

जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीचे चार मजली बांधकाम हे शहरातील प्रियदर्शनी इंदिरा गांधी क्रीडा संकुलालगत असणार्‍या जागेत चालू आहे. या  इमारतीस शासनाचा 9 कोटी 68 लाखांचा निधी मंजूर असून त्यापैकी 7 कोटी 63 लाख मिळाले आहेत. जि.प.कडील 2 कोटी 90 लाखांचा निधी असा एकूण 10 कोटी 53 लाख निधी खर्च झाला आहे. सध्या हे काम 75 टक्के पूर्ण झाले असून अजून 25 टक्के काम अपूर्ण आहे. बांधकाम मुदत संपल्यानंतर सर्वसाधारण सभेत मार्च 2019 पर्यंत वाढवली. या कामाला गती आली असून येत्या डिसेंबर अखेर ते पूर्ण होणार आहे. 

ग्रामीण भागाचा विकास साधणार्‍या जि.प.ला मिनी मंत्रालय असे संबोधले जाते. सध्या ज्या जागेत कामकाज होते तेथे जागा अपुरी आहे. यामुळे पशुसंवर्धन, स्वच्छ भारत मिशन, आरोग्य, माध्यमिक शिक्षण, सर्व शिक्षा अभियान, ग्रामीण विकास यंत्रणा, नरेगा यासह इतर काही महत्त्वाच्या विभागांची कार्यालये इतरत्र आहेत. यासाठी सन 2011 मध्ये नवीन इमारत बांधकामासाठी मान्यता घेतली. शासनाकडून 9 कोटी 68 लाखाच्या निधीस मंजुरी मिळाली. यातून इमारत बांधकामाचा शुभारंभ सन 2012-13 साली झाला.

हे काम 30 जून 2017 पर्यंत पूर्ण करणे अपेक्षित होते, पण ते झाले नाही. यात सर्वच विभाग एकाच छताखाली यावेत, अशी व्यवस्था केली आहे. ही इमारत चार मजली बांधकामातून पूर्ण होणार आहे. पहिल्या एक व दोन मजली कामासाठी शासनाकडून 7 कोटी 63 लाखांचा निधी मिळाला. यासाठी व्ही.यू.बी.इंजिनिअरिंग प्रा.लि., मुंबई यांना कंत्राट दिले. तसेच तीन व चार मजली कामासाठी नवीन निविदा काढून कंत्राटदार आर.जी.देशमुख यांना काम दिले. तीन व चार मजली कामासाठी 5 कोटी 59 लाख 86 हजार 621 रुपयांचा निधी आहे. हा निधी जि. प.च्या स्वउत्पन्‍नातून खर्च होणार आहे. शासन मान्यतेतील 2 कोटींचा निधी येणे शिल्‍लक असून जि.प.चाही 2 कोटी 90 लाखांपर्यंत निधी खर्च झाला आहे.  

अशी झाली निधीची तरतूद

शासनाचा 9 कोटी 68 लाखांचा निधी मंजूर आहे. आतापर्यंत 7 कोटी 63 लाख मिळाला. यात पहिला व दुसरा मजला पूर्ण झाला. अजून शासनाचे 2 कोटी 5 लाख रुपये येणे शिल्‍लक आहे. जि.प.ने 2016-17 मध्ये 1 कोटी 50 लाख निधी प्रस्तावीत करून 63 लाख दिले. 2017-18 मध्ये 2 कोटी 30 लाख दिले असून पुढील कामासाठी 2018-19 करिता 2 कोटीचा निधी प्रस्तावीत केला आहे.