उस्मानाबाद : प्रतिनिधी
गल्लीत क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या वादात मध्यस्थी केल्याच्या रागातून पराभूत संघातील खेळाडूंनी एका तरुणाचा निर्दयी खून केला. मंगळवारी रात्री घरात घुसून हा खून झाल्याने नागरिक संतप्त झाले. या नागरिकांनी बुधवारी सकाळी मृतदेह घेऊन आलेल्या अॅम्ब्युलन्ससह जिल्हाधिकारी कार्यालयात ठिय्या मांडला. यामुळे शहरात तसेच सांजारोड परिसरात दिवसभर तणावाचे वातावरण होते.
शहरालगतच्या सांजारोड परिसरातील संत गोरोबाकाकानगर येथे ही थरारक घटना घडली. प्रत्यक्षदर्शी तसेच पोलिसांनी सांगितले, की सांजा चौकातील काही तरुणांनी तेलंगणाहून येथे शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थ्यांबरोबर मंगळवारी क्रिकेट सामना खेळला. यात तेलंगणाचा संघ विजयी झाला. तेलंगणा संघाने जिंकलेल्या 200 रुपयांची मागणी पराभूत संघाकडे केली. त्यातूनच हा वाद झाला.
शेजारीच राहणार्या आकाश गंगावणे (वय 22, रा. सिद्धार्थनगर, सांजारोड) याने मध्यस्थी करून वाद मिटविण्याचा प्रयत्न केला. पुढे वादही शांत झाला. सायंकाळी सातच्या सुमारास 10 ते 12 तरुण दुचाकीवरून सिद्धार्थनगरात आले आणि त्यांनी घरात घुसून मध्यस्थी का केली, अशी विचारणा करीत गंगावणे याच्यावर चाकूने वार केले. यावेळी आकाशच्या आई-वडिलांनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांना ढकलून दिले. या प्रकाराने सिध्दार्थनगरात पळापळ सुरू झाली. आकाशला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. आकाशची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पहाटे दोनच्या सुमारास सोलापूरला हलविले. दरम्यान, उपचार सुरू असतानाच आकाशचा मृत्यू झाला.
त्याच्या मृत्यूची बातमी समजल्यानंतर सिध्दार्थनगरात तणाव पसरला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याचे पाहून पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दुपारी दोनच्या सुमारास या परिसरातील शेकडो नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून हल्लेखोरांना अटक करण्याची मागणी केली. त्याचदरम्यान आकाशचा मृतदेह घेऊन अॅम्बुलन्स शहरात आली. ती थेट आंदोलनस्थळी आणल्यानंतर पोलिसांचे कडे तोडून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दारात नेण्यात आली.
यावेळी आंदोलक प्रचंड आक्रमक झाले असल्याने पोलिसांनीही संयमाने परिस्थिती हाताळली. पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांनी हल्लेखोरांना पकडून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलक आकाश गंगावणे अमर रहे.. अशा घोषणा देत निघून गेले. दरम्यान, अटक केलेले आरोपी दाखवेपर्यंत अंत्यसंस्कार न करण्याची भूमिका स्मशानभूमीत मयताचे नातेवाईक तसेच नागरिकांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.