Tue, Mar 26, 2019 01:47होमपेज › Marathwada › चहा विक्रीतून तरुणाने साधली आर्थिक सुबत्ता

चहा विक्रीतून तरुणाने साधली आर्थिक सुबत्ता

Published On: Jul 13 2018 12:49AM | Last Updated: Jul 12 2018 10:08PMअंबाजोगाई : रवी मठपती

तालुक्यातील जवळगावच्या विकास देशमुख यांनी आपल्या प्रामाणिपणा व दर्जेदारपणाच्या जोरावर चहाच्या व्यवसायातून आर्थिक सुबत्ता मिळवली आहे. पदवीधर असतानाही त्यांनी नोकरीच्या शोधात भटकत न फिरता स्वतःचा  चहा विक्रीचा व्यवसाय सुरू केला, ही विशेष बाब आहे. त्याचप्रमाणे विकास देशमुख यांनी इतर सहा बेरोजगारांच्या  हाताला काम दिले आहे. त्यांच्या हाताला न्यारीच चव असल्याने दूरहून त्यांच्याकडे चहाचे शौकीन येत आहेत.
विकास हे कला शाखेचे पदवीधर आहेत. आर्थिक परिस्थिती जेमतेम  असल्याकारणाने पुढील शिक्षण पूर्ण करू शकले नाहीत, त्यामुळे नोकरीही नाही. त्यांच्या वडिलांचा चहा विक्रीचा छोटा व्यवसाय. हाच व्यवसाय त्यांनी स्वीकारून त्यात गोडी निर्माण केली आहे.

कोणताही व्यवसायात  प्रामाणिकपणे, टिकून व गुणवत्तापूर्ण असावा लागतो हा मूलमंत्र वडिलांककडून विकास यांना मिळाला. जवळगावच्या बस थांब्याजवळ देशमुख यांचे चहाचे हॉटेल आहे. पहाटे पाच वाजता हॉटेल सुरू होऊन रात्री नऊ वाजेपर्यंत चालूच असते. दिवसभरात गावातील तरुण, वृद्ध, व्यवसायिक, कामानिमित्त  येणारे जाणारे नागरिक, प्रवाशी, चालक, वाहक, सर्वजण विकास देशमुख यांच्या हॉटेलमधील चवदार व वाफाळलेला चहा पिण्यासाठी आवर्जून येतात. चहाची चव चाखता-चाखता येथे अनेकदा चाय पे चर्चाही झडतात. चहासाठी दररोज दोनशे लिटर दूध, साडेतीन किलो चहा पावडर, पंचवीस किलो साखर लागते. महिन्याकाठी इंधन खर्च दहा हजार रुपये येतो. यातून त्यांना दिवसाकाठी चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी आर्थिक सुबत्ता साधली आहे. बेरोजगार तरुणांसमोर विकास यांनी चांगला आदर्श निर्माण केला आहे.