Thu, Apr 25, 2019 15:33होमपेज › Marathwada › आपले सरकार सेवा केंद्राची वेबसाईट बंद

आपले सरकार सेवा केंद्राची वेबसाईट बंद

Published On: Mar 24 2018 1:51AM | Last Updated: Mar 24 2018 1:02AMसेनगाव : प्रतिनिधी

आपले सरकार सेवा केंद्रावर शेतकर्‍यांना आपल्या हक्‍काचे सातबारा वेळेवर मिळत नाही. दिवसभरात सेवा केंद्रावरील सातबारासंदर्भातील कार्यरत असलेली वेबसाईट आठ तास बंद राहत असल्याने शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय वाढली. मागील अनेक महिन्यांपासून हा प्रकार सुरू असून प्रशासनाकडून याची दखल घेऊन अपेक्षित सुधारणा केली गेली.

मागील काही महिन्यांपासून शासनाने तलाठी हस्तलिखित सातबारा बंद केला. तत्पूर्वी संपूर्ण शेतकर्‍यांच्या शेतीचा सातबारा ऑनलाइन काम पूर्ण केले. मात्र नवीन होल्डिंग डाटा ऑनलाइन प्रक्रिया अद्याप झाली नाही. शेतकर्‍यांना वेळेवर सातबारा मिळाव्यात म्हणून आपले सरकार सेवा केंद्रावर ही सुविधा उपलब्ध केली होती. मागील एक वर्षापासून सेवा केंद्रावर शेतकर्‍यांना वेळेवर सातबारा मिळत नसल्याचा सातत्याने प्रकार घडत आहे.

जमीन खरेदी, विक्री, कर्ज प्रकरण, न्यायालयीन कामकाज यासह विविध कामांसाठी शेतकर्‍यांना सातबाराची आवश्यकता भासते. पूर्वी तलाठी हस्तलिखित सातबारा झटपट मिळत असे, मात्र ऑनलाइन सातबारानंतर शेतकर्‍यांना असुविधेला सामोरे जावे लागत आहे. दररोज सकाळी 9 वाजेपर्यंत व संध्या. पाचनंतर ऑनलाइन सातबारा मिळतो. दिवसभरातील आठ तास संबंधित वेबसाईटमध्ये अनेक तांत्रिक अडचणी उद्भवतात, परिणामी सातबारा मिळत नाही. तासन्तास सेवा केंद्रावर ताटकळत बसल्यानंतरही  वेळेवर सातबारा मिळत नसल्याने शेतकर्‍यांची प्रचंड गैरसोय वाढली आहे. बर्‍याचदा वैतागून गेलेल्या व ऑनलाइन अडचणींबाबत माहिती नसणार्‍या शेतकर्‍यांचा व सेवा केंद्र चालकात वाद होतो.शासनाने सर्व कामकाज ऑनलाइन करण्यावर भर दिला असला तरी त्यामुळे नागरिकांची सुविधा होते की असुविधा, याचा प्रामुख्याने विचार होत नाही असा आरोप होत आहे. सातबाराप्रमाणेच विविध कामांसाठी होल्डिंगची आवश्यकता शेतकर्‍यांना असते. मात्र नवीन होल्डिंग डाटा ऑनलाइन प्रक्रिया झाली नाही. महा भूमीअभिलेख वेबसाईटवरील काढलेल्या होल्डिंगचा उपयोग होत नाही.