Mon, Apr 22, 2019 05:43होमपेज › Marathwada › सुटींच्या दिवशीही सायंकाळी मनपाचा कर भरता येणार

सुटींच्या दिवशीही सायंकाळी मनपाचा कर भरता येणार

Published On: Apr 27 2018 12:45AM | Last Updated: Apr 26 2018 11:15PMपरभणी : प्रतिनिधी 

शहर महापालिकेच्या वतीने मालमत्ता व नळपट्टी धारकांच्या संदर्भात महापौर यांच्या दालनात बैठक घेण्यात आली. यात महापौर मीनाताई वरपुडकर, उपमहापौर माजू लाला, सभापती गणेश देशमुख, सभागृह नेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी, मंगलाताई मुदगलकर, चंद्रकांत शिंदे, कर अधीक्षक अलकेश देशमुख, बील कलेक्टर यांची बैठक घेऊन प्रभाग समिती अ,ब,क, अंतर्गत शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी घरपट्टी व नळपट्टी भरण्यासाठी दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत कार्यालय उघडे राहणार आहे. तसेच सुटीच्या दिवशीही ते चालू राहणार  असून नागरिकांनी घरपट्टी, नळपट्टी भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 परभणी शहर महानगरपालिकेने मालमत्ता कर नवीन आकारणी व नळपट्टी थकबाकीदारांना अनेक सूचना दिल्या आहेत. यात काही प्रमाणात त्यांना सूट दिली आहे. सर्व मालमत्ताधारकांनी या सुटचा फायदा घ्यावा व मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापौर मीनाताई वरपुडकर, उपमहापौर माजू लाला, सभापती गणेश देशमुख, सभागृह नेते भगवान वाघमारे, विरोधी पक्षनेते विजय जामकर, गटनेते जलालोद्दीन काजी,  मंगलाताई मुदगलकर, चंद्रकांत शिंदे यांनी केले आहे. मालमत्ताधारकांनी नवीन आकारणीच्या मागणी बिलात 2017-18 ची चालू मागणी व मार्च 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांसह एकरकमी कर भरल्यास त्यांच्या रकमेवर आकारलेल्या शिस्ती (व्याज) दि.30 एप्रिल पर्यंत 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. नळपट्टी धारकांनी मार्च 2017 पर्यंतच्या थकबाकीदारांसह मार्च 2017-18 पर्यंतची चालू मागणी एक रक्कमी भरल्यास थकबाकीच्या रकमेवर आकारलेली शास्ती (व्याज) दि. 30 एप्रिलपर्यंत 100 टक्के सूट दिली जाणार आहे. 

सन 2017-18 मध्ये केलेल्या मालमत्ताकर आकारणी मागणी बिलामध्ये नमूद केलेल्या वर्गीकरणात बदल करून नगर रचना विभागाने दि.30 मार्च रोजीच्या आदेशात झालेल्या वर्गीकरणाच्या बदला नुसार सन 2017-18 ची वसुली करण्यात येईल असे कळवले आहे. सर्व मालमत्ताधारकांनी उपलब्ध असणार्‍या बांधकाम परवानगीच्या सर्व कागदपत्रांच्या सत्यप्रती दि. 30 एप्रिलपर्यंत आपल्या प्रभाग समिती कार्यालयात जमा कराव्यात जेणे करून ज्या मालमत्ताधारकांनी बांधकाम परवानगी घेतली.त्यांंना बांधकाम परवानगी घेतलेल्या क्षेत्रापुरत्या कर आकारणीवर अनधिकृत बांधकामाची शास्ती लावण्यात येणार नाही. 

सन 2008 पूर्वी बांधलेल्या सर्व बांधकामांना अनधिकृत बांधकामासाठीची शास्ती माफ करण्यात येणार आहे. ज्या मालमत्ताधारकांचे आपल्या इमारतीचे किंवा इमारतीच्या काही भागाचे बांधकाम दि. 4 जानेवारी 2008 च्या पूर्वी झालेले असेल अशा मालमत्ताधारकांने असे बांधकाम दि. 4 जानेवारी 2008 च्या पूर्वी झालेले आहे, असे सिद्ध होणारी कागदपत्रे व मागणी बिलाची छायांकित प्रत सोबत जोडून आपल्या प्रभाग समिती कार्यालयात दि. 30 एप्रिलपर्यंत दाखल करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags : Marathwada, You, can, pay, municipal, tax, evening, holidays