Wed, Mar 27, 2019 03:57होमपेज › Marathwada › गुरुच्या स्वप्नपूर्तीसाठी राहुलची कठोर मेहनत

गुरुच्या स्वप्नपूर्तीसाठी राहुलची कठोर मेहनत

Published On: Jul 27 2018 1:33AM | Last Updated: Jul 27 2018 1:33AMपाटोदा : महेश बेदरे

पाटोद्याचा भूमिपुत्र व कुस्तीपटू राहुल बाळासाहेब आवारे याने  ऑस्ट्रेलिया देशातील गोल्ड कोस्ट येथे झालेल्या व कुस्ती क्षेत्रात अत्यंत मानाच्या समजल्या जाणार्‍या राष्ट्रकुल स्पर्धत सुवर्णपदक जिंकून देशाचे नाव उंचावले. आता आपल्या गुरुचे ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राहुलचा संघर्ष सुरू आहे. 

गाव अन् परिसरातील कुस्तीचे फ ड गाजवून राहुल राज्य स्तरावर पोहोचला. त्यानंतर त्याने 2004 साली पुणे येथे रुस्तुम-ए-हिंद पेहलवान स्व. हरिश्‍चंद्र बिराजदार मामा यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे डावपेच शिकण्यास सुरुवात केली. बिराजदार मामांच्या कठोर शिस्तीखाली त्याची पुढील वाटचाल सुरू झाली. बिराजदार मामा जेवढे शिस्तीचे तेवढेच हळवे देखील होते. पाटोद्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या राहुलला त्यांनी खरोखरच पुत्रवत प्रेम करून घडविले.

त्यांच्याच मार्गदर्शनाखाली राहुल लाल मातीत तासन्तास मेहनत करीत असे. आखाड्याच्या बाहेर बिराजदार मामा हे आपल्या या शिष्याची मोठी काळजी घेत. राहुलचे दुखणे असो, आर्थिक अडचणी असो वा मानसिक आधाराची गरज असो मामा हे कायम भक्कमपणे पाठी उभे राहिले. अनेक वेळा खचलेल्या मनस्थितीत केवळ गुरुंच्या पाठबळा मुळेच पुन्हा उभे राहून हे यश मिळाल्याचेही राहुलने सांगितले. 2011 मध्ये आपले गुरू बिराजदार मामांच्या निधनानंतर राहुलला प्रचंड धक्का बसला होता, मात्र गुरुंचे ऑलिंपिक पदकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तो परत लढत राहीला.

त्याने ऑलिंपिकच्या निवड चाचणीपर्यंत मजल मारली. परंतु त्याची ऑलिंपिकची संधी थोडक्यात हुकली होती. जिगरबाज राहुलने हार न मानता कठोर मेहनत सुरूच ठेवली. ऑस्ट्रेलियात राष्ट्रकुलमध्ये सुवर्ण पदक जिंकून आपल्या गुरुंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने दमदार वाटचाल केली. राहुल हा सध्या पुणे येथील क्रीडा संकुलात पै.वस्ताद काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. ऑलिंपिकमध्येही नक्कीच विजय मिळवून गुरुंचे स्वप्न निश्चित पूर्ण करणार असा विश्वास राहुलने व्यक्त केला.