Wed, Oct 17, 2018 22:08



होमपेज › Marathwada › लग्नास पैसे न दिल्याने मालकाची निर्घृण हत्या

लग्नास पैसे न दिल्याने मालकाची निर्घृण हत्या

Published On: Feb 09 2018 10:36AM | Last Updated: Feb 09 2018 10:36AM



नागपूर : प्रतिनिधी

लग्नासाठी पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या नोकराने अमरावतीच्या एमआयडीसीतील राजेंद्र ऑईल इंडस्ट्रीजच्या मालकाचा तीक्ष्ण हत्याराने खून केला. ठाकूरदास धुलारामजी करेसिया असे खून झालेल्या मालकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे. विश्‍वास रामुजी शेषकार असे आरोपीचे नाव आहे.

ठाकूरदास करेसिया यांची एमआयडीसी परिसरात प्लॉट क्रमांक 31-बी येथे राजेंद्र ऑईल इंडस्ट्री आहे. करेसिया यांच्याकडे पूर्वी विश्‍वास शेषकार हा कामाला होता. काही दिवसांपासून त्याने ठाकूरदास यांच्याकडे लग्नाला जाण्यासाठी 50 हजार रुपयांसाठी तगादा लावला होता. परंतु, ठाकूरदास यांनी नोकराला पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या विश्‍वासने ठाकूरदास यांच्यावर तीक्ष्ण हत्याराने हल्ला केला. या हल्ल्यात ठाकूरदास यांच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या होत्या.

त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी मृत ठाकूरदास यांचा मुलगा नरेंद्र करेसिया याने पोलिसांत तक्रार दिली. नोकर शेषकार याच्याविरुद्ध सोमवारी गुन्हा दाखल करून पोलिसांनी अटक केली आहे.