Sat, Feb 23, 2019 14:24होमपेज › Marathwada › अंगणवाडी कर्मचार्‍यांचे काम तुटपुंज्या मानधनावर

अंगणवाडी कर्मचार्‍यांचे काम तुटपुंज्या मानधनावर

Published On: Mar 10 2018 2:08AM | Last Updated: Mar 10 2018 1:17AMसेलू : संतोष कुलकर्णी

जागतिक महिला दिन साजरा करताना समाजाच्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी काम करणार्‍या, नव्हे राबणार्‍या अंगणवाडी कर्मचार्‍यांकडे मात्र शासनाचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.

शासनाच्या महिला व बाल विकास मंत्रालयामार्फत ग्रामीण भागात चालविण्यात येत असलेल्या अंगणवाड्यांची अवस्था बिकट असून अंगणवाडी कर्मचारी तुटपुंज्या मानधनावर काम करत आहेत. तालुक्यामध्ये एकूण 155 अंगणवाड्या आहेत. यामध्ये 150 मोठ्या अंगणवाड्या तर 5 मिनी अंगणवाड्या आहेत. यामध्ये 148 अंगणवाडीताई तर 144 मदतनीस व 5 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. सेलू तालुक्यामध्ये 117 अंगणवाड्यांच्या स्वतंत्र इमारती आहेत. तर अद्यापही 38 अंगणवाड्यांना स्वतंत्र इमारती नसल्याची स्थिती आहे.

या अंगणवाड्यांमधून 0 ते 3 वयोगटांतील 4 हजार 826 तर 3 ते 6 वयोगटांतील 6 हजार 345 असे एकूण 11 हजार 171 बालक अंगणवाडीमध्ये येतात.तर या अंगणवाड्यामार्फत 937  गरोदर माता तर 1 हजार 178 स्तनदा माता यांना पोषण आहारसुद्धा देण्यात येतो. अंगणवाडीमध्ये बालकांना मूलभूत शिक्षणासोबत पोषण आहार देण्यात येतो.तर अंगणवाडी कर्मचारी यांना केंद्र व राज्य सरकारकडून तुटपुंजे मानधन मिळते. प्रतिमाह 5 हजार रुपये मानधन या अंगणवाडीताईंना देण्यात येते. त्यांना मदतीला असणार्‍या मदतनिसांना 3 हजार रुपये मानधन शासनाकडून देण्यात येते. तर शासनाचे इतर कामेही या अंगणवाडीताईंच्या माथी मारले जातात. यामुळे बालकांवर लक्ष देण्यात अंगणवाडीताईंना अडचणी निर्माण होत आहेत. अशा सर्व प्रक्रियेतूनही या तुटपुंज्या मानधनावर घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांना नाईलाजास्तव नोकरी करण्याची वेळ येत आहे. याचाच गैरफायदा प्रशासनातील अधिकारी व शासन उचलीत असल्याची ओरड सुजाण नागरिकांतून होत आहे. याकडे आता तरी शासन लक्ष वेधील काय? असा संतप्‍त सवाल उपस्थित केला जात आहे.