Thu, Jun 20, 2019 20:47होमपेज › Marathwada › दारूबंदी लढ्यात महिलांचा विजय, प्रत्यक्षात मात्र हार

दारूबंदी लढ्यात महिलांचा विजय, प्रत्यक्षात मात्र हार

Published On: Jul 16 2018 1:23AM | Last Updated: Jul 16 2018 12:06AMआडस : प्रतिनिधी

केज तालुक्यातील आडस येथे मतदान होऊन गावातील दारू विक्री बंद झाल्याचे आज सोमवार (दि.16) रोजी सात वर्ष झाले. दारूबंदीसाठी येथील महिलांनी मोठा लढा दिला होता. त्यावेळी मतदान करण्यासाठी व त्याच्या प्रक्रियेसाठी थेट न्यायालयाची पायरी चढण्यात आली होती. या सर्व घडामोडीनंतर महिलांनी मतदान केले, यात महिलांचा विजय झाला व गावातील दारूविक्री बंद झाली. त्याकाळी अतिशय गाजलेली ही दारूबंदीची निवडणूक व त्यात मिळविलेला महिलांचा विजय याचा आनंद मात्र फार काळ ठिकला नाही. या गावात पुन्हा जोमात अवैध दारू विक्री करण्यात येत आहे.

आडस येथे दि. 16 जुलै 2011 रोजी गावातील महिलांच्या आंदोलनामुळे दारूबंदीसाठी मतदान घेऊन बाटली आडवी करण्यात आली होती. या घटनेला आज सात वर्ष पूर्ण झाली. दारूबंदी झाले तेव्हा गावामध्ये दारूविक्रीची सहा दुकाने होती. आता मात्र, गावर व परिसरात विनापरवाना दारू विक्रीची वीस दुकाने आहेत. किराणा दुकान, चहाची टपरी, हॉटेल, धाबे यांचा आधार घेऊन आतून दारूचा व्यवसाय राजरोस केला जात आहे. विविध व्यवसायिकांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असा प्रकार सुरू आहे. विविध व्यवसायाच्या आडून दारू विक्री केली जात असल्याने गावातील तरुण मुलेही दारूच्या आहारी जाऊ लागली आहेत. 

आडस व परिसरात दारू विक्रीतून दररोज वीस हजार रुपयांपर्यंत उलाढाल होत आहे. येथील चौकाचौकात तळीराम धिंगाना घालतात तर पती-पत्नीत दारूमुळे नित्याचे वाद होत आहेत. दारूमुळे मजुरांचे आर्थिक शोषण केले जात आहे. सात वर्षांपूर्वी दारूबंदी होऊनही आता गाव व परिसरात अवैध दारू विक्री जोमात सुरू असल्याने याचा गावातील सामाजिक सलोख्यावरही विपरीत परिणाम होत आहे. शिवाय ज्या महिलांनी दारूबंदीसाठी लढा दिला, त्यांच्या पदरीही निराशा आली आहे. त्यामुळे अवैध दारूविक्री बंद करण्याची मागणी  सविता आकुसकर यांनी केली आहे.