Fri, May 24, 2019 02:29होमपेज › Marathwada › अंबाजोगाईत महिलेच्या पोटी जन्मली मत्स्यपरी!

अंबाजोगाईत महिलेच्या पोटी जन्मली मत्स्यपरी!

Published On: May 21 2018 3:48PM | Last Updated: May 21 2018 3:58PMअंबाजोगाई (वार्ताहर)

अंबाजोगाई वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागात आज (२१ मे) रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास एका महिलेने दुर्मिळातील दुर्मिळ बाळाला जन्म दिला. या बाळाला वैद्यकीय परिभाषेत सिरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणातात. सदरील बाळाला अवघ्या १५ मिनिटांचेच आयुष्य लाभले.  वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रसुती व स्त्रीरोग विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी पट्टीवडगाव येथील एक महिला प्रसुतीसाठी रुग्णालयात दाखल झाली. आज सकाळी आठच्या सुमारास तिला प्रसुती वेदना सुरु झाल्यानंतर तिला प्रसुतीगृहात नेण्यात आले.

नऊच्या सुमारास तिने बाळाला जन्म दिला. प्रसुतीनंतर बाळाची तपासणी केली असता बाळास दोन पायाऐवजी दोन पाय जोडलेला एकच पाय आणि लिंग नसलेले शरीर आढळून आले. सदरील महिलेची प्रसुती ही अत्यंत नॉर्मल झाली असली तरी बाळाची प्रकृती तशी जन्मतःच चिंताजनक होती. अशा विचित्र अवस्थेत जन्मलेल्या बाळाला अवघे १५ मिनीटांचे आयुष्य मिळाले. याबाबत डॉ.संजय बनसोडे यांच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला असता डॉ. बनसोडे यांनी अशा अवस्थेत जन्मलेल्या बाळाला सिरोनोमेलिया (मत्सपरी) असे म्हणतात अशी माहिती दिली. अशी केस लाखात एखादी असते अलिकडील काही वर्षात या वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे तर मराठवाड्यातच अशा प्रकारचे मत्स आकारातील बाळ जन्माला येण्याची ही पहिलीच घटना आहे असे बनसोडे यांनी यावेळी सांगितले. 

सदरील बाळाला जन्म देणारी माता ही पट्टीवडगाव येथील रहिवासी असून ती ऊसतोड कामगार आहे. या माताने गर्भधारणेनंतर कसलेही औषधोपचार घेतलेले नाहीत. एक महिन्यापूर्वी खाजगी रूग्णालयात सोनोग्राफी केली असता या बाळाच्या किडनी आणि फुफ्फुसात अडचण असल्याचे वैद्यकीय अहवालात नमुद करण्यात आले होते.  सदरील बाळ (मत्सपरी) ही वैद्दकीय महाविद्यालयाच्या प्रसुती विभागातील म्युझियममध्ये वैद्यकीय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी व संशोधनासाठी ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे बनसोडे यांनी म्हटले आहे.