Fri, Jul 19, 2019 05:00होमपेज › Marathwada › वादळी वार्‍याचा आंब्याला फटका

वादळी वार्‍याचा आंब्याला फटका

Published On: Apr 18 2018 12:50AM | Last Updated: Apr 17 2018 10:38PMलिमला : शिवबाबा शिंदे 

वातावरणातील बदलाचा सर्वाधिक फटका फळांचा राजा आंब्याला बसत आहे. यंदाची गारपीट आणि वादळीवार्‍यासह झालेल्या पावसामुळे आंबा उत्पादक परेशान आहेत. असेच वातावरण शेवटपर्यंत राहिले तर यावर्षी गावरान आंब्याच्या मधूर रसाळीला  मुकावे लागणार आहे.

गतवर्षी पाऊसमान वृक्षसंपदा बहरण्याजोगे झाले. चिंच, बोर, उंबर आदींसह वरच्या पाण्यावर अवलंबून असलेली फळे जोरदार पिकली. याचा  सर्वाधिक फायदा आंब्याला झाला. मात्र निसर्गाचा लहरीपणा पथ्यावर पडल्याने या फळांच्या राजाला सलग दुसर्‍यांदा  बेमोसमी वादळीवार्‍यासह पावसाचा सामना करावा लागला. सरतेशेवटी गावरान आंबा खायला राहतो की नाही, असा प्रश्‍न खवय्ये विचारू लागले आहेत.

आमराईचा मोहोर गळाला : लिमला भागात फेब्रुवारीमध्ये गारपीट झाल्यामुळे बहरलेल्या आमराईचा मोहोर निम्याच्या वर गळून पडला तर काही ठिकाणी मोहोराला बुरशी लागली. उरल्यासुरल्या मोहराचे आंबे परिपक्‍व होत असताना दोन दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार वादळीवार्‍यासह पावसाने झाडाखाली आंब्याचा सडा पडला. पहिल्यापासूनच हाल सोसत आलेल्या आमराईला पुन्हा वातावरण बदलाचा फटका बसल्याने यावर्षी स्थानिक आंब्याचा गावरान मधूर गोडवा लुप्त होण्याची शक्यता आहे.