Sun, Apr 21, 2019 02:09होमपेज › Marathwada › वायफाय बसला आता हायफायची प्रतीक्षा

वायफाय बसला आता हायफायची प्रतीक्षा

Published On: Jan 30 2018 1:52AM | Last Updated: Jan 30 2018 12:34AMपरभणी : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांना आजही सुविधांचा अभाव आहे. भंगार बसमधूनच ग्रामीणसह लांबपल्ल्याच्या प्रवास करणार्‍या सर्वसामान्य प्रवाशांना आजही जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. या बस कधी रस्त्यातच पंक्‍चर होत असून त्यात दुसरे टायरही नसते तर अनेक बसमध्ये जॅकही नसल्याचे समजते. सध्या बसला वायफाय करण्यात आले असले तरी त्यांना प्रवाशांच्या सुविधेसाठी हायफाय केव्हा करणार? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून बसकडे पाहिले जाते. पण या बसच्या निर्मितीपासून अद्यापपर्यंत परिवहन महामंडळाकडून यात काही विशेष सुधारणा केली नाही. सतत या बस कधी बसस्थानकात तर कधी रस्त्यावर बिघडलेल्या दिसतात. त्रस्त होतच प्रवाशांना प्रवास करावा लागतो. बसने विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, अपंग यांच्यासाठी खास सवलतीच्या दरात तिकिटांची आकारणी केलेली आहे. मात्र, असुविधा व बसच्या खराब स्थितीमुळे त्यांना नाहकच त्रास सहन करावा लागतो. आता महामंडळाने बसला वायफाय बसवून प्रवाशांना मनोरंजनाचे साधन दिलेे. त्यामुळे प्रवासी खुश होतील आणि यातून एसटीचे उत्पन्‍न वाढेल, हा महामंडळाचा भ्रमाचा भोपळा ही योजना कार्यान्वित झाल्यावर तत्काळ फुटला. महामंडळाने बसला वायफायप्रमाणे हायफाय करण्यासाठी बसगाड्या, कर्मचारी, प्रवासी यांच्या समस्या सोडविण्याची गरज निर्माण झाली आहे.