Sun, Apr 21, 2019 03:51होमपेज › Marathwada › अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का?

अवैध व्यवसायाला ठाणेदाराची संमती का?

Published On: Jul 17 2018 1:35AM | Last Updated: Jul 16 2018 10:48PMसेनगाव : प्रतिनिधी

तालुक्यात ठाणेदाराच्या मूकसंमतीने अवैध व्यवसायिकांना सुगीचे दिवस आल्याचे चित्र आहे. राजरोसपणे अवैध दारू विक्री मटका, जुगार अड्ड्याचे व्यवसाय सुरू आहेत. हे सर्व प्रकार माहीत असूनही पोलिस प्रशासनाकडून निव्वळ बघ्यांची भूमिका घेतली जात आहे. शिवाय वरिष्ठ अधिकारी दौरा व पथक येण्याची माहिती काही खबर्‍याकडून तत्काळ दिली जात असल्याची चर्चा आहे.

तालुक्यातील विविध गावांत अवैध देशी दारू मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. सहजरीत्या अतिदुर्गम व डोंगराळ भागातील खेडेगावात देशी दारू उपलब्ध होते. शिवाय काही गावांमध्ये गावठी दारू काढून त्याची विक्री होते. देशी व गावठी दारूच्या अवैध प्रकारामुळे मद्यप्राशन करण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांतून होऊ लागला आहे. राज्यात गुटखा बंदी असताना या तालुक्यातील पानटपर्‍या, किराणा दुकानावर गुटख्याची खुलेआम विक्री होत आहे. 

त्यामुळे राज्यात गुटखा बंदी असली तरी तालुक्यात मात्र कागदोपत्री गुटखा बंदी असल्याचे चित्र आहे. या अवैध प्रकारावर अंकुश बसविण्याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांना एक प्रकारे अभय मिळत आहे. पोलिसांनी गुटखा पकडला तर पुढील कार्यवाही अन्न व भेसळ विभागाकडून केली जाते. त्यामुळे हा विषय आमच्या अखत्यारित नसल्याचे पोलिसांकडून बोलल्या जाते. सबंधित विभागाला या गैरप्रकाराची तिळमात्र चिंता होत नाही. परिणामी शाळा परिसरातील छोट्या टपर्‍यावरही गुटखा विक्री होेते. कमी वयातील मुले गुटखा व्यसनाच्या आहारी जात असल्याने आरोग्याचा प्रश्‍न गंभीर होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.

सेनगाव शहरात वर्दळीच्या ठिकाणी मटका, जुगार अड्डा, तितली-भवरा अवैध व्यवसाय थाटण्यात आला आहे. येथे दिवसभरात मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते. खुलेआम चालणार्‍या अवैध व्यवसायाला ठाणेदाराची मूकसंमती असल्यामुळेच ठोस कार्यवाही होत नाही असा आरोप जनतेतून होऊ लागला आहे. विशेष म्हणजे वरिष्ठ पोलिस अधिकारी दौरा व पथक येण्याची तत्काळ खबर पोलिसांकडून अवैध व्यावसायिकाला देऊन सर्तक केले जात असल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, यामुळे अवैध व्यवसाय एक प्रकारे सुरक्षित चालतो. स्थानिक पोलिस प्रशासन व वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांकडून अवैध व्यवसायाकडे जाणिवपूर्वक दुर्लक्षाची भूमिका घेतली जाते. याचा अर्थ काय हा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे.

दरम्यान तालुक्यात अवैध दारू, गुटखा विक्री, मटका, जुगार अड्ड्याचा राजरोसपणे चालू असलेल्या प्रकारावर अंकुश बसणार की नाही हा प्रश्‍न अनुत्तरीत आहे. स्वहितासाठी पोलिसांकडून या प्रकाराला मूकसंमती असल्याची चर्चा जोरात होऊ लागली आहे. हिंगोली ग्रामीण उपविभागाअंतर्गत येणार्‍या पोलिस ठाण्यातील अधिकार्‍यांना यापूर्वीही अवैध धंद्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. याउपरही कुठे अवैध धंदे सुरू असतील तर त्या संदर्भातील माहिती मिळाल्यास आम्ही पथक पाठवून तत्काळ कारवाई करू अशी प्रतिक्रिया हिंगोली ग्रामीणचे उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सिद्धेश्‍वर भोरे यांनी दिली.