Wed, Jul 24, 2019 07:50होमपेज › Marathwada › दिंडी-पालख्यांच्या स्वागताची 40 वर्षांपासून परंपरा कायम

दिंडी-पालख्यांच्या स्वागताची 40 वर्षांपासून परंपरा कायम

Published On: Jul 03 2018 1:53AM | Last Updated: Jul 03 2018 12:00AMपरभणी : प्रदीप कांबळे

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणार्‍या  विदर्भ, मराठवाड्यातील 40 हून अधिक संतांच्या पालख्यांचे  स्वागत करण्याची परंपरा शहरातील नवा मोंढा परिसरात श्री रोकड हनुमान संस्थान व व्यापारी मंडळाकडून जपली जात आहे.  यावर्षी 1 जुलैपासून पालख्यांचे परभणीत आगमन होण्यास सुरुवात  झाली आहे. 3 जुलै रोजी शेगावचे श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे  आगमन शहरात होणार असल्याने संस्थानतर्फे स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. 

मागील 40 वर्षांपासून संतांच्या पालख्यांचे स्वागत करण्याची परंपरा रोकड हनुमान संस्थान व व्यापारी मंडळाने जपली आहे.   विदर्भ व मराठवाड्यातील 40 च्या वर संतांच्या पालख्या परभणी शहरातून परळीमार्गे पंढरपूरकडे रवाना होतात. रोकड हनुमान संस्थान व मोंढा परिसरातील व्यापारी मंडळ दरवर्षी परिश्रम घेतात. यासाठी जवळपास 500 स्वयंसेवक दररोज शहरात दाखल झालेल्या संत पालखीच्या व्यवस्थेचे नियोजन करतात आणि त्यांना सुविधा पुरविण्याचे काम केल्या जाते. व्यापारी अन्नदान करून येणार्‍या वारकर्‍यांच्या जेवणाची व नाष्ट्याची सोय मोठ्या भक्‍तिभावाने करतात. यावर्षी 14 जुलैपर्यंत संत पालख्या शहरात येणार असून यासाठी पाच लाख रुपये खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. शिवाय शहरातील भक्‍तांकडून पालखीत सहभागी असलेल्या वारकर्‍यांना फराळ व फळांचे वाटप करतात. यावर्षी डॉ. रवी भंडारी यांच्याकडून आरोग्य विषयक सुविधा देण्यात येणार आहे. 27 जूनपासून श्री संत गजानन महाराज यांच्या ग्रंथाचे पारायण होत असून त्याचा समारोप 3 जून रोजी होणार आहे. 

संत महंमद खान पालखीचा प्रथमच मुक्‍काम

विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील गणुरी गावचे गजानन महाराज भक्‍त संत महंमद खान यांची पालखी यावर्षी प्रथमच परभणीत मुक्कामी थांबणार आहे.  महंमद खान यांना विठ्ठलभक्‍तीची ओढ असल्याने ते दरवर्षी पंढरपूरच्या वारीला जात असत. त्यामुळे त्यांच्या पश्‍चातही ही प्रथा अशीच कायम राहावी यासाठी संत महम्मद खान मठ संस्थान गणुरीची पालखी दरवर्षी आषाढी एकादशीला पंढरपूरला जात असते.

पालख्यांंचे होणार 3 ते 14 जुलैदरम्यान शहरात आगमन : श्री संत भाकरे महाराज, पांढूरणा (म.प्र.), श्री हनुमान देवाच्या कमिटी मसोटा, श्रीक्षेत्र सरस्वतीदेवी संस्थान तपोवन, वाशीम, श्री संत भाकरे महाराज मसोरा, श्री संत गुलाबराव महाराज चांदूरबाजार, श्री नरसिंग महाराज आकोट, श्री संत गजानन महाराज शेगाव, श्री दत्तगुरु सेवा मठ तारसा,नागपूर, श्री संत भोजाजी महाराज अंजनसरा,श्री जगन्नाथ  महाराज वणी, श्री भावसार माउली अकोला, श्री चंदाजी महाराज कुल्हा,ओंकारेश्‍वर भगवान कोनाथा पालख्यांसह  40 च्यावर दिंड्यांचे स्वागत होणार आहे.

मोफत कटिंग-दाढी 

नाभिक समाजाच्या नागराज सेनेतर्फे पालख्यांमध्ये सहभागी असलेल्या वारकर्‍यांची मोफत कटिंग व दाढी केल्या जाते. यासाठी 200  नाभिक बांधव  नवा मोंढा परिसरात पालखीचे आगमन होताच भाविकांची सेवा करतात. वारकर्‍यांची सेवा करण्याचे नागराज सेनेचे हे तिसरे वर्षे आहे.