Sat, Apr 20, 2019 09:51होमपेज › Marathwada › राष्ट्रवादीला आम्ही सेक्यूलर मानत नाही

राष्ट्रवादीला आम्ही सेक्यूलर मानत नाही

Published On: Jul 21 2018 1:31AM | Last Updated: Jul 20 2018 10:43PMबीड : प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी सेक्यूलर पक्षांशी आघाडी करण्यास उत्सुक आहे. सर्व सेक्यूलर पक्ष एकत्र येऊन लढले तर भाजपला तीन अंकी संख्याही गाठता येणार नाही, असे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आम्ही सेक्यूलर पक्ष मानत नाही. राष्ट्रवादीची भाजपची जवळीक आहे. आमच्या आघाडीत पवारांना यायचे असेल अथवा आम्हाला सोबत घ्यायचे असेल तर अगोदर त्यांना सेक्यूलरपणा सिद्ध करावा लागेल, असे प्रतिपादन खा. प्रकाश आंबेकडर यांनी केले. ते बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. 

खा. आंबेडकर म्हणाले की,  भाजप पूर्वीपासूनच आरक्षणविरोधी आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजासाठी 16 टक्के जागा राखीव  ठेवण्याची केलेली घोषणा चुकीची आहे. त्यांना मुळात मराठा समाजाला आरक्षण द्यायचे नाही. आरक्षण द्यायचेच असते तर 16 टक्केची घोषणा न करताही मराठा समाजाला त्यांना आरक्षण देता आले असते. घटनादुरुस्ती झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, हे जरी सत्य असले तरी राज्यापुरता मराठा आरक्षणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, मात्र हे करण्यास सरकार तयार नसल्याचा आरोप खा. प्रकाश आंबेडकर यांनी केला. मुळात आरएसएसला संविधान मान्य नव्हते. आमचे सरकार आल्यावर संविधान बदलू असे 1950 मध्ये म्हटले होते. आता, भाजप सरकार सत्तेवर आल्यावर संविधान बदलण्याची भाषा केली होती. आता भाजप सरकार सत्तेवर आले आहे. मात्र आम्ही संविधान बदलू देणार नाही. संविधान वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

भाजप सरकार हे श्रीमंत, त्यानंतर उपेक्षितांचे व त्यानंतर गरिबांचे आहे. मनोहार भिडे याचा वापर आरएसएस करीत आहे. त्यामुळेच वारी सुरू होण्यापूर्वी मनू हा संत तुकारामांपेक्षा श्रेष्ठ होता, असे विधान हेतू पुरस्सर केले गेले. त्याचा निषेध आम्ही करतो, असे खा. आंबेडकर म्हणाले. पत्रकार परिषदेस उपराकार लक्ष्मण माने यांची प्रमुख उपस्थिती होती.

वंचित बहुजन परिषदेला उत्स्फू र्त प्रतिसाद

भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत बीड शहरातील बार्शी रोडवरील एका मंगल कार्यालयात शुक्रवारी वंचित बहुजन आघाडी संवाद परिषद पार पडली. कार्यक्रमास वंचित, उपेक्षित समाज मोठ्या संख्येने उपस्थित होता. व्यासपीठावर लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, सुशीला मोराळे, कॉ. नामदेव चव्हाण, अमित भुईगळ यांची प्रमुख उपस्थिती होती.