Mon, Mar 25, 2019 13:19होमपेज › Marathwada › कुंडलिका धरणातील पाणीसाठा दूषितच 

कुंडलिका धरणातील पाणीसाठा दूषितच 

Published On: Jul 12 2018 1:41AM | Last Updated: Jul 12 2018 1:41AMवडवणी : प्रतिनिधी

तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणाचे पाणी दूषित असल्याचे आरोग्य विभागाच्या तपासणीत आढळून आले आहे. बीड येथील प्रयोगशाळेतील मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी पाणी तपासणी करून पाठविलेला अहवाल वडवणी तालुका प्रशासनाला  प्राप्त झाला आहे.

वडवणी तालुक्यातील उपळी येथील कुंडलिका धरणात मासे मोठ्या प्रमाणावर मृत झाल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. प्रशासनाने गंभीर दखल घेतली होती. तहसीलदार सुनील पवार यांनी या धरणातील मासेमारी बंद करण्याचे आदेश देऊन आरोग्य आणि पशुवैद्यकीय विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत धरणातील  पाणी आणि मृत मासे प्रयोगशाळेत शास्त्रज्ञांमार्फत तपासणी करण्यासाठी पाठविले होते. त्यानुसार  बीड येथील मुख्य अनुजीव शास्त्रज्ञांनी कुंडलिका धरणातील  पाण्याची तपासणी करून  पाणी तपासणी अहवाल वडवणी प्रशासनाला पाठविला आहे. या अहवालात धरणातील पाणीसाठ्यात अनेक घातक घटक असल्याचे नमूद करून पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचे म्हटले आहे. 

जो पर्यंत धरणातील पाणी शुद्ध होणार नाही तो पर्यंत मासेमारीसाठी परवानगी मिळणार नसल्याचे संकेत तहसील प्रशासनाने दिले आहेत. मंगळवारी व  बुधवारी उपळी येथील मासेमारी  करणार्‍या नागरिकांनी वडवणी येथील तहसीलदार सुनील पवार व नायब तहसीलदार शारदा दळवी यांच्याकडे मासेमारीसाठी परवानगी मागितली मात्र थोड थांबावे लागेल. पाणी जलशुद्धीकरण करण्यासंदर्भात काय उपाययोजना करता येतील ते अगोदर पाहिले जाईल अन् नंतरच मासेमारीसाठी परवानगी मिळणार असल्याचे त्यांनी  सांगितले.