Sun, Oct 20, 2019 01:09होमपेज › Marathwada › जिल्हा रुग्णालयात पाण्याची वानवा

जिल्हा रुग्णालयात पाण्याची वानवा

Published On: Mar 25 2018 1:50AM | Last Updated: Mar 25 2018 1:34AMपरभणी : प्रतिनिधी

जिल्हा सामान्य रुग्णालयातील  10 नंबरच्या कक्षात मागील तीन दिवसांपासून पाण्याच्या भीषण टंचाईचा सामना करावा लागत आहे. शौचालयांंतही पाणी उपलब्ध नसल्याने दुर्गंधीत राहण्याची वेळ आली आहे. या सर्व प्रकाराने त्रस्त रुग्ण नातेवाईकांनी शनिवारी (दि.24)  सकाळी साडेआठ वाजता क्षयरोग दिनाच्या रॅलीनिमित्त कार्यक्रमास हजर असलेल्या सीईओ बी.पी.पृथ्वीराज यांच्याकडे धाव घेत आपले गार्‍हाणे मांडले. यानंतर पाण्याची उपलब्धता करण्यात आली.

ग्रामीण भागातून मोठया प्रमाणात जिल्हा सामान्य रुग्णालयात गोरगरीब रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याचा गवगवा रुग्णालय प्रशासनाकडून नेहमीच केला जातो. येथे सर्वच आजारांचे हजारो रुग्ण दाखल आहेत. सर्वच कक्षात पाण्याच्या सुविधा उपलब्ध केल्या आहेत, पण यापैकीच नवीन तीन मजली उभारणी केलेल्या बालरोग कक्ष, मनोरुग्ण कक्ष, कैदी कक्षात मात्र मागील तीन दिवसांपासून भीषण पाणीटंचाईचा सामना सुविधा उपलब्ध असतानाही रुग्णांसह नातेवाईकांना करावा लागला. याप्रकरणी संबंधित कक्षातील प्रमुखांकडे नातेवाईकांनी वारंवार पाण्याची मागणी केली होती. याकडे सदरील प्रशासनाने कानाडोळा केला असल्याचे नातेवाईकांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले. यात संतप्‍त झालेल्या नातेवाईकांनी शनिवारी जागतिक क्षयरोग दिनाच्या कार्यक्रमात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज यांच्याकडे धाव घेतली. यावेळी हा प्रश्‍न माझ्या अखत्यारित येत नाही, याबाबत मी मनपाचे आयुक्‍त रेखावार यांच्याशी चर्चा करतो असे त्यांनी नातेवाईकांना सांगितले.