Fri, Apr 26, 2019 09:23होमपेज › Marathwada › अनेक गावांत पाणी टंचाई!

अनेक गावांत पाणी टंचाई!

Published On: Mar 06 2018 12:54AM | Last Updated: Mar 06 2018 12:53AMपालम : मारुती नाईकवाडे

काही महिन्यांपासून दुर्दैवाने तालुक्यातील सर्वच जनता कमी-अधिक प्रमाणात कोरड्या दुष्काळाचा सामना करत आहे. पं.स.ने तयार केलेला 3 कोटी 54 लाख 80 हजारांचा पाणीटंचाईचा कृती आराखडा कागदोपत्रीच जोर धरीत असल्याचे दिसून येत  आहे.

तालुक्यात 82 गावांचा समावेश आहे. त्यापैकी  काही भाग सुपीक तर काही भाग हा  डोंगरी गावांचा आहे. तालुक्यातील डिग्रस बंधारा व डोंगरगाव येथे साठवण तलाव आहेत. डिग्रस बंधार्‍यातील पाणी नांदेड जिल्ह्यासाठीच वापरले जाते. पाणीटंचाईबाबत पं.स. कार्यालयात अद्याप अधिकार्‍यांची बैठक झालेली नाही. तर ग्रामविकास अधिकार्‍यांविना तयार केलेला  3 कोटी  54 लाख 80 हजारांचा कृती आराखडा पाठविला आहे. तालुक्यातील रामपूर तांडा येथे  आजही टँकरच्या पिण्याचे पाणी पुरवले जात आहे. आणखी तीन  गावांचे टँकर संदर्भातील प्रस्ताव पं.स. कडे प्राप्त झाले आहेत. तालुक्यातील 26 गावांच्या अधिग्रहणाचे प्रस्ताव कार्यालयात दाखल झाले आहेत. 

चार्‍याचा प्रश्न बिकट

पिण्याच्या पाण्याबरोबरच चार्‍याचा प्रश्नही बिकट बनत जाणार आहे. यावर्षी अल्प पाऊस पडल्यामुळे शेतकर्‍यांना चाराटंचाई मोठया प्रमाणावर जाणवणार आहे. तातडीने चार्‍याची व्यवस्था करावी लागणार आहे. स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने भ्रष्टाचारापासून मुक्त अशी जनावरांच्या छावण्यांची चळवळ तालुक्यात चालवावी लागणार आहे. दुष्काळ निवारणात सरकारने केवळ सरकारी यंत्रणेवर अवलंबून न राहता नि:स्वार्थी स्वयंसेवी संस्थांना सोबत घेऊन काम केले पाहिजे.

दीर्घकालीन उपाय हवेतच

दुष्काळ निवारणाचे तातडीने करावयाचे उपाय करतानाच दीर्घकालीन उपायांचाही विचार व्हायला हवा. काही प्रमाणात निधी खर्च झाला आहे.  शेततळे, कोल्हापूर पध्दतीचे बंधारे, पाझर तलाव अशा लघुसिंचन प्रकल्पांचे जाळे गावागावांत शेतकरी, स्वयंसेवी संस्था आणि सरकारी यंत्रणा यांनी एकत्रित प्रयत्नांमधून उभे करण्याची खरी गरज आहे. जेथे अशा प्रकारे जलसंधारण केले आहे, तेथे अशा दुष्काळातही परिस्थिती तुलनेने अधिक चांगली आहे.