Mon, Jun 24, 2019 21:43होमपेज › Marathwada › उन्हाळ्याच्या सुरुवातीस टंचाईचे सावट

उन्हाळ्याच्या सुरुवातीस टंचाईचे सावट

Published On: Mar 06 2018 12:54AM | Last Updated: Mar 06 2018 12:48AMवसमत : प्रतिनिधी

वसमत तालुक्यात उन्हाळ्याच्या सुरुवातीस तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या अनुषंगाने तालुक्यातील 8 गावांच्या बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव तहसील विभागात दाखल करण्यात आले. तर 7 गावांचे प्रस्ताव पं.स. पाणीपुरवठा विभागाकडे आले आहे. भविष्यात पाणीटंचाईचे चित्र बिकट होणार असल्याने प्रशासनाने त्वरित लक्ष देऊन पाणी टंचाई संदर्भात योग्य ते पाऊल उचलणे गरजेचे आहे.

वसमत तालुक्यातील भूजल पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला तालुक्यातील बहुतांश गावात पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ 76 लाखांचा पाणीटंचाई आराखडा मंजूर आहे.प्रशासनाने पाणीटंचाईकडे गांभीर्याने लक्ष देत उपाय योजनास सुरुवात करणे गरजेचे आहे.

तालुक्यातील पिंपळा चौरे, परजना, बोरगाव बु., कागबन या गावांचे प्रस्ताव तहसील विभागात दाखल होऊन महिना उलटत आहे. अद्यापही कोणतीही उपाय योजना ग्रामस्थांसाठी अमलात आली नाही. तोच सोनातर्फे हट्टा, पुयनी बु, रेणकापूर, तुळजापूरवाडी या गावांचेही प्रस्ताव तहसील विभागात दाखल करण्यात आले आहे. तर तेलगाव, आडगाव, खांबाळा, पळसगाव, कोठारवाडी, कोठारी, बोराळा या गावांचेही बोअर अधिग्रहणासाठी प्रस्ताव दाखल केले जाणार आहेत. तालुक्यातील कुरुंदा, आंबा, बहिरोबा चोंढी, वाई यांसह आदी गावांतही पाण्यासाठी भटकंती होत आहे. प्रशासनाने त्वरित उपाययोजना अमलात आणणे गरजेचे आहे.

उन्हाळ्याच्या सुरुवातीस तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत आहे. तर भर उन्हाळ्यात गंभीर चित्र निर्माण होणार असल्याचे संकेत आज दिसून येत आहे. तालुक्यातील लहान, कोठारवाडी येथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

गत दोन महिन्यांपूर्वी येलदरी, सिध्देश्वर कालव्यातून एक पाणी पाळी वसमत विभागात सोडण्यात आली होती. त्या पाणी पाळीचा चांगलाच फायदा नागरिकांना झाला. सध्या पाणीटंचाईचे चित्र बिकट बनत चालले आहे. पाण्यासाठी पाणी पाळी सोडण्यात आल्यास पाणी टंचाईवर या भागात थोड्या फार प्रमाणात मात होईल. 

तसेच कुरुंदा, सोमठाणा, गिरगाव, मुरुंबा, बोरगाव, दाभडी, पार्डी बु, पार्डी खु.यासह आदी गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी इसापूर धरणातून पाणी पाळी सोडणे आवश्यक आहे. वसमत तालुक्यातील पाणीटंचाई निवारणार्थ शासनाने 76 लाखांचा आराखडा मंजूर असूनदेखील उपाय योजनांना खीळ बसल्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीसच नागरिकांची पाण्यासाठी भटकंती होताना दिसून येत आहे.