Thu, Jul 18, 2019 02:21होमपेज › Marathwada › जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निवळले

जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट निवळले

Published On: Feb 04 2018 1:55AM | Last Updated: Feb 04 2018 1:06AMबीड :  प्रतिनिधी

दरसाल पाणीटंचाईचे चटके सहन कराव्या लागणार्‍या बीड जिल्हा वासियांना यंदा चांगला पाऊस पडल्याने अच्छे दिन आले आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकल्पातील पाणीसाठा मिळून 100 दश लक्ष घन मीटर पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तर, आज घडीला जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठी 65 टक्के असल्याने शेतीचा प्रश्‍नही सुटला आहे. 

बीड जिल्ह्याला गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागते. फेबु्रवारी, मार्चमध्येच धरण तळ गाठत असल्याने गावोगाव ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येते. त्यामुळे प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर पाण्याचे नियोजन करावे लागते. यावर्षी मात्र सरासरीच्या (666 मीमी) शंभर टक्के पाऊस झाल्याने धरणांमध्ये आजही मुबलक पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदा उन्हाळ्यातही पिण्यासाठी मुबलक पाणी मिळणार आहे. 

बीड जिल्ह्यात मोठे दोन प्रकल्प (माजलगाव व मांजरा) आहेत. गोदावरीमध्येही पिण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी राखीव ठेवले जाते. यासह मध्यम प्रकल्प 16 व लघु प्रकल्प 126 आहेत. या प्रकल्पांमध्ये यंदा 100 टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे या वर्षीच्या खरीप हंगामास शेतीसाठी मुबलक पाणी मिळाले आहे. यासह आजही या प्रकल्पांमध्ये 65 टक्के पाणीसाठा असल्याने रब्बी हंगामासाठीही शेतीला पाण्याची सोय झाली आहे. यामुळे शेतकर्‍यांना सिंचनाची मोठी सोय उपलब्ध झाली आहे. 

पाणीसाठा शिल्लक असला तरी पाण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये मोठ्या प्रकल्पातील 70 दलघमी पाणीसाठी, मध्यम प्रकल्पातील 20 दलघमी व लघु प्रकल्पातील 8 दलघमी (एकूण 99.31 दलघमी) पाणीसाठी पिण्यासाठी राखीव ठेवण्यात आला असल्याची माहिती पाटबंधारे विभागातून देण्यात आली. जिल्ह्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने यंदा पाणीटंचाईच्या झळा जिल्हावासीयांना लागणार नाहीत, याचेही नियोजन प्रशासनाने केले आहे.