Wed, Aug 21, 2019 19:20होमपेज › Marathwada › अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ ढिशक्याव!

अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ ढिशक्याव!

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 12:13AMआष्टी : प्रतिनिधी

वॉटर कप स्पर्धेला शनिवारी मध्यरात्री 12 वाजून 1 मिनिटांपासून तालुक्यातील 30 गावांनी श्रमदानाला सुरुवात केली. करंजी येथे तहसीलदार रामेश्वर गोरे, दत्ता काकडे यांच्यासह ग्रामस्थांच्या उपस्थितीत या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी गावकर्‍यांनी दिलेल्या ‘अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ ढिशक्याव’ घोषणेने परिसर दणाणून गेला होता.

याबरोबरच जामगाव, वाहिरा, चिंचाळा या प्रमुख गावांत जाऊन या मान्यवरांनी पहाटे चार वाजेपर्यंत श्रमदान केले. विशेष म्हणजे वाहिरा येथील भूमिपुत्र तथा यवतमाळ जिल्ह्यातील मूर्तझापुरचे तहसीलदार रवी फरतारे यांनीही यात सहभाग नोंदवून वाहिर्‍याचे भूमिपुत्र या नात्याने श्रमदान करून या कामास सुरुवात केली.

आष्टी तालुक्याचे तहसीलदार रामेश्वर गोरे यांनी शनिवारी मध्यरात्री काही गावांना भेट देऊन शुभारंभाची कुदळ चालवली. दुष्काळाशी दोन हात करत त्यांनी घोषणेतही सहभाग घेतल्याने गावकर्‍यांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न गुडगुडे, नाल गुडगुडे, दुष्काळ ढिशक्याव ढिशक्याव ढिशक्याव या घोषणेने या कामाची सुरुवात झाली असून तालुक्यातील 113 गावांनी यात सहभाग नोंदविला असून 45 दिवस ही स्पर्धा आता रंगणार तर होईलच मात्र यातून गाव दुष्काळमुक्त करून पाणीदार करण्याची शपथ घेऊनच अनेक ग्रामस्थांनी टिकाव, कुदळ हातात घेतल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यासाठी महिलांनी देखील पुढाकार घेत आपला सहभाग नोंदविला आहे. या स्पर्धेत सहभागी 11 गावांतील ग्रामस्थांममध्ये एक नवा उत्साह संचारला असून यामुळे टंचाईमुक्तीची अपेक्षा आहे.

टिकाव-खोरेताई विवाह
गावाला पाणीदार बनवण्याची या घोषणेसह तालुक्यातील कासेवाडी येथील युवकांनी काशिगिरी बाबा देवस्थान परिसरात रात्री 12 वाजता पावसाच्या वातावरणात चि. टिकाव (दादा) व चि.सौ.का.खोरेताई यांचा शुभविवाह करून मंगलमय वातावरणात कामाला सुरुवात करण्यात आली.

वीस गावांनी केली श्रमदानाला सुरुवात
तालुक्यात यावर्षी पाणी फाउंडेशनच्या वाटर कप स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली. सहभागी 40 गावांपैकी 20 गावांनी 8 एप्रील च्या पहिल्या ठोक्याला स्पर्धेतील कामाला श्रमदान करून सुरुवात केली. गतवर्षी राज्यात दुसर्‍या आलेल्या जायभायवाडी येथे अभिनेता जिंतेद्र जोशी यांची विशेष उपस्थिती होती. यासाठी भारतीय जैन संघटना व ज्ञानप्रबोधनी यांनी सुरुवाती पासूनच पुढाकार घेतला आहे.

या तालुक्यात वाटर कप स्पर्धेच्या माध्यमातून दुष्काळ मुक्त तालुका करून पाणीदार करण्या साठी तिसर्‍या वाटर कप स्पर्धेत चाळीस गावे उतरणी असून स्पर्धेच्या पहिल्या दिवशी पहिल्या ठोक्यास वीस गावांनी स्पर्धेतील कामाची सुरुवात केली. गतवर्षी राज्यात या स्पर्धेत दुसरे आलेले व प्रेरणादायी असणार्‍या जायभायवाडी येथे सिने अभिनेता जितेंद्र जोशी यांच्या उपस्थितीत  ग्रामसभा घेऊन गावामध्ये मशालफेरी काढून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.

येथे डोंगरीभागात या जितेंद्र जोशी यांनी श्रमदानात स्वतः सहभाग घेतला पाचशे पेक्षा जास्त लोकाच्या उपस्थीतीत 21 एल बी एस उभारून श्रमदानाची सुरुवात केली. या श्रमदानात रात्र व डोंगरदर्‍यात काम असताना महिला, बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पाणी फाउंंडेशनचे मराठवाडा समन्वयक संतोष शिनगारे हे येथे उपस्थित होते. तालुक्यात पांगरी, आसोला, हिंगणी, व्हरकटवाडी, सिंगनवाडी, आम्ला, कोळपिंप्री, आसरडोह, कारी, निमला, चौंडी, अंजनडोह आदी गावात रात्रीच श्रमदान करण्यात आले. स्पर्धेच्या सुरुवातील या गावच्या ग्रामस्थानी उत्साहाने कामाला सुरुवात केली. 8 एप्रिलला सकाळी या चाळीस ही गावातील नागरिकांनी श्रमदानाला सुरुवात केली. स्पर्धा लोकचळवळीचे स्वरूप धारण करत आहेत.

मशनरी उपलब्ध
श्रमदाना बरोबर जायभायवाडी, आसोला, कारी, आम्ला, व्हरकटवाडी, पांगरी या गावांत भारतीय जैन संघटना व ज्ञानप्रबोधनी या संस्थांनी मशीनरी उपलब्ध करून दिल्या मुळे पहिल्या दिवशीच मशीन कामही सुरू करून या कामातील धडाडी नागरिकानी दाखवून दिली आहे. 
 

Tags : Water Cup Tournament, Ashti